पुणे - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राहणारे नागरिक धास्तावले आहेत. याशिवाय परराज्यातून पुण्यात नोकरी, कामाधंद्यानिमित्त आलेल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. यात उत्तर भारतातील नागरिकही आहेत. सध्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुण्यातील शाळा, महाविद्यालयांसह खासगी क्षेत्र तसेच बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे उत्तर भारतातील नागरिक आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकात गर्दी करत आहेत.
दरम्यान, यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने पुणे हावडा, पुणे गोरखपूर, पुणे पाटणा अशा विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे जिथे आवश्यकता नाही अशा काही गाड्याही रद्द केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.