पुणे - समाजात अलीकडच्या काळामध्ये आपला विचार हाच अंतिम विचार आहे. दुसऱ्या विचाराला जागा नाही ही भावना आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळते. जगभरातील उपेक्षितांना आपण आपल्या देशात जागा देऊन आमच्या संस्कृतीमध्ये त्यांना सामावून घेऊन आपलं केलं. अशा संस्कृतीमध्ये आता विचार मांडताना बंधने येऊ लागले आहे. त्यात अडचण देखील निर्माण होऊ शकते. खरा विचार जर मांडला किंवा योग्य विचार मांडला तर त्याला ब्रँडिंग करायचं ही काही मूठभर लोकांनी संकल्पना राबवली आहे. याला अलीकडच्या काळात ट्रोलिंग म्हणतात. विचारांचं ट्रोलिंग बंद करावं लागेल आणि समाजालाही त्यासाठी एकत्र यावं लागेल, असं मत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.
रामभाऊ माळुंगे प्रबोधिनीतर्फे पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या सय्यद भाई, नामदेव कांबळे, गिरीश प्रभुणे, पोपटराव पवार तसेच सरस्वती सन्मान विजेते साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचा सत्कार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
आरक्षणापासून समाजाचा एक घटक आजही दूर आहे -
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची भूमिका मांडत असताना पहिल्यांदा 50 वर्षांसाठी आरक्षण ठेवलं. मग अटलजींनी त्याला वाढ दिली. मग मोदींनी वाढ दिली. पण आजही जेव्हा आपण दलित समाजाची परिस्थिती पाहतो तेव्हा तर अजून खूप काळ आम्हाला आरक्षण राबवावं लागेल, अशी स्थिती आहे. या राज्यातील मातंग समाज असेल, सुदर्शन, बुरुड, वाल्मिकी समाज असेल अशी एक मोठी समाजाची व्यवस्था आहे. ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर आरक्षणाचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे. असं कुठेही दिसत नाही. आरक्षणापासून समाजाचा एक घटक आजही दूर आहे. ज्यांना मिळालं त्यांना आनंदच आहे पण ज्यांना मिळू शकलं नाही. त्यांच्यापर्यंत ते कसं पोहोचेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नाहीतर आपण आरक्षित समाजातून दोन वर्ग तयार करू, आमच्या शेड्युल कास्टमध्ये देखील अशी अवस्था येऊ नये की आहेरे नाहीये तयार झाले आहे. अशी परिस्थिती येऊ नये यासाठी अशा वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ मिळेल यासाठी व्यवस्था उभी केली पाहिजे. असं यावेळी फडणवीस यांनी सांगितलं.
आता सरकार नाही तर समाज सुचवेल कोणाला पुरस्कार दिला पाहिजे -
मोदी सरकारने पद्म पुरस्काराचे निकष बदलले आहेत. पद्म पुरस्कार हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराची पद्धत बदलली आहे. आतापर्यंत ज्यांना पुरस्कार मिळाले ते देशातील पद्म होतेच पण जमिनीवर काम करणारी सामान्य माणसांमध्ये काम करणारी फारशी प्रसिद्धीच्या झोतात न येणारी मंडळी पुरस्कारापासून वंचित राहिली होती. यापैकी कोणीही पुरस्कारासाठी काम करत नव्हते पण समाजाचेही कर्तव्य होते की अशा लोकांनाही हा पुरस्कार दिला पाहिजे. कारण या पुरस्काराच्या माध्यमातून समाजाला चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. आता सरकार नाही तर समाज सुचवेल कोणाला पुरस्कार दिला पाहिजे. आता अशा व्यक्तींना पूरस्कार मिळत आहे. असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितलं.
हेही वाचा - Tokyo Olympics: सुवर्ण पदकाच्या शर्यतीत नीरज चोप्रासमोर 'या' 5 दिग्गजांचे आव्हान