पुणे - पुण्यातील जनजीवन, सण, परंपरा, सांस्कृतिक विश्व पूर्ववत व्हावं, हीच इच्छा असून तसे प्रयत्न सुरू आहेत. आपण सर्वांनी या शहराची कोविड काळात काळजी घेतली. हे संकट लवकरच जाईल, अशी आशा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.
पुण्यभूषण फाऊंडेशनच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले. हा प्रकाशन सोहळा फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली कट्ट्यावर उत्साहात पार पडला. हॉटेल वैशालीचे मालक जगन्नाथ शेट्टी आणि या हॉटेलच्या कामगारांना प्रकाशनाचा मान देण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती या प्रकाशन समारंभाला होती. पुण्याची सांस्कृतिक ओळख जगात पोहोचवू, त्यासाठी पुण्यभूषणची सांस्कृतिक चळवळ उपयोगी ठरत आली आहे, असेही मोहोळ यावेळी म्हणाले.
एका शहराला समर्पित असलेला हा एकमेव दिवाळी अंक असल्याचा दावा प्रकाशकाकडून केला जातो. या परंपरेतील हा दहावा दिवाळी अंक आहे. दरवर्षी पुण्याला साजेशी संकल्पना घेऊन प्रकाशन समारंभ आयोजित करीत असतो, असे आयोजकांनी सांगितले. यावर्षी पुण्याच्या कट्टा संस्कृतीतील मानाचे पान असलेल्या ‘वैशाली हॉटेल‘ या कट्ट्यावर प्रकाशन समारंभ करीत आहोत. यापूर्वी पोस्टमन, सांस्कृतिक विश्वाची बातमीदारी हाताळणारे पत्रकार, दगडूशेठ गणेश मंदिर, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखे विविध मान्यवर पुणेकरांना आणि ठिकाणांना प्रकाशन समारंभाचा मान दिला गेला आहे. यावर्षीच्या अंकातील पहिले मानाचे पान जगन्नाथ शेट्टी यांना समर्पित करण्यात आले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे, पुणेकरांचे आणि अनिवासी पुणेकरांचे लेख, आठवणी हे यावर्षीच्या पुण्यभूषण दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे. प्रकाशन समारंभात शेखर केंदळे यांनी राग भटियार गाऊन प्रारंभ केला.