पुणे - देशातील विविध राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. दुसरी लाट ओसरल नसताना तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका वर्तवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमिवर पुण्यातील पाहिले लहान मुलांचे कोविड सेंटर येरवडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे उभारण्यात आले आहे. येथे कोविड बाल कक्ष देखील उभारण्यात आले आहे.
विविध खेळणीसह लहान मुलांसाठी ५० बेड तयार-
सीवायडीए, बहुजन हिताय सामाजिक बांधिलकी संघ, सौ. शीला राज साळवे ट्रस्ट, पुणे महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. पाच मजली या वसतीगृहाच्या पहिल्या मजल्यावर लहान मुलांसाठी ५० बेड तयार करण्यात आले आहेत. लहान मुलांसह त्यांच्या पालकांचीही राहण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. या मुलांसाठी स्वतंत्र भोजन कक्ष, खेळणी तसेच कार्टुनचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या ठिकाणी ऑक्सिजन कक्षही निर्माण करण्यात आला आहे. रुग्णाला त्वरित तात्पुरत्या स्वरुपात ऑक्सिजन देवून बिकट परिस्थीतीतून बाहेर काढण्यासाठी या कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.
लहान मुलांसाठी विविध सोयीसुविधा -
कोरोना झाल्यानंतर लहान मुलांना भीती वाटू नये, यासाठी या कोविड रुग्णालयात भिंतीवर विशेष सजावट करण्यात आली असून खेळण्याकरीता विविध खेळणी इथे ठेवण्यात आल्या आहेत. लहान मुलांना आवडणारे मोटू - पतलू, छोटा भीम असे कार्टूनही भिंतीवर लावण्यात आल्याने इथे आल्यानंतर लहान मुलांकरता आनंददायी वातावरणही निर्माण करण्यात आले आहे. त्याचसोबतच तीनवेळचे जेवण,नाश्ता, दूध, तज्ज्ञ डॉक्टर, नर्सेस ऍम्ब्युलन्स या ठिकाणी चोवीस तास हजर असणार आहेत. याचसोबत इथे 180 बेड हे ज्येष्ठ नागरिकांकरता तयार करण्यात आले असून ऑक्सिजनची सुविधा असणार आहे.
पुण्यातील पाहिलं बाल कोविड सेंटर -
लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने खबरदारी म्हणून या कोविड बालकक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या, ५० बेड तयार केले गेले आहे. बंगळुरू, चेन्नई येथील कोविड सेंटरचा अभ्यास करून या बालकक्षाची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी नगरसेवक अविनाश साळवी यांनी दिली.