पुणे : आज या कार्यक्रमात हिंदू, पारसी, शीख, बौद्ध अशा सर्व धर्मगुरूंना एका व्यासपीठावर एकत्र आणून आपण एकतेचा संदेश देत आहो. आपला देश अनेक जाती आणि धर्मांचा देश आहे. हे सर्व आपलं सौंदर्य आहे. हे सौंदर्य उठून ठेवण्यासाठी याला लागलेल्या विविध फुलांचा सन्मान केला पाहिजे. पण आपल्यामध्ये कुणी जातीय द्वेष निर्माण करत असेल, तर त्यांना धडा शिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ( NCP Chief Sharad Pawar ) केलं.
राष्ट्रवादीचे ईद मिलन : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सर्वधर्मीय ईद मिलनचा ( Ed Milan NCP ) कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण तसेच सर्वधर्मीय धर्मगुरू देखील उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
जगात तर चमत्कारी परिस्थिती : आज भारतामध्ये चुकीचे विचार पसरवले जात आहेत. त्यांनी लगतच्या देशांची परिस्थिती पहावी. केवळ राजकारणासाठी वातावरण दूषित करू नये. "हा देश अनेक जाती-धर्माने बनला आहे. यात विविधता आहे, ती उठून दिसायची असेल, तर या देशात जी फुलं उमलली आहेत त्या सर्व फुलांचा सन्मान करायला हवा. आज देशात जी वेगळी स्थिती निर्माण झाली आहे. जगात तर चमत्कारी परिस्थिती निर्माण झालेली आहे, असं देखील यावेळी पवार म्हणाले.
इतर देशातील परिस्थितीवर देखील भाष्य केलं : यावेळी कार्यक्रमात पवार यांनी जगातील इतर देशातील परिस्थितीवर देखील भाष्य केलं. ते म्हणाले की रशियासारखा ताकदवर देश एका लहान देशावर (युक्रेन) हल्ला करतोय. त्या मोठ्या देशाला मानवतेचं स्मरण नाहीये. श्रीलंका या देशात बुद्धाचं तत्वज्ञान आहे. त्या देशात नागरिक रस्त्यावर उतरालाय आणि राज्याकर्त्यांना अंडरग्राउंड व्हावं लागतंय. पाकिस्तानमध्ये तुमचे माझे भाऊबंद सुद्धा राहतात. पाकिस्तानमध्ये प्रधानमंत्र्यांना पदावरून बाजूला केलं जातंय. त्या देशातील राज्यकर्त्यांच्या भूमिकेमुळे हे पहायला मिळतंय. मी पाकिस्तानला अनेकवेळा गेलोय. ज्या ठिकाणी जाईल तिथं पाकिस्तानमध्ये स्वागत केलं जायचं. देशाचा मंत्री आणि क्रिकेटच्या माध्यमातून अनेकवेळा पाकिस्तानला गेलो. पाकिस्तानात एकवेळा जेवण करायला गेल्यानंतर आमच्या जेवणाचे त्यांनी पैसे घेतले नाहीत. आम्ही त्यांचे पाहुणे आहोत म्हणून आमचा आदर केला गेला. पाकिस्तानचा सामान्य माणूस आपला विरोधक नाहीये. फक्त राजकीय लोक तशी परिस्थिती निर्माण करतात. तेथील लोकांचे नातेवाईक भारतात आहेत, तर भारतातील नागरिकांचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत, असं देखील यावेळी पवार ( Sharad Pawar On Pakistani Peoples ) म्हणाले.
पुण्यातून शांती आणि बंधुभावाचा संदेश जाऊद्या : आज आपण इथं कशासाठी जमलो? जात-धर्म बाजूला ठेऊन माणुसकी जपायला जमलो. प्रश्न नक्कीच खूप आहेत. महागाई, विकासाचे प्रश्न उभे आहेत. पण देशात जे चित्र उभं झालंय. त्या अनुषंगाने आपल्याला सध्या बंधुभाव जपणे गरजेचे आहेत. मी पक्ष-बिक्ष मानत नाही, आत्ताही इथं विविध पक्षाचे नेते आहेत. देशहितासाठी आपण सगळे जमलोय. निवडणुकीचा यात कोणताही विचार नाही. पुण्यातून शांती आणि बंधुभावाचा संदेश जाऊद्या. सर्वांना कळू द्या, हा आपला आदर्श सर्वांपर्यंत पोहचू द्या, असंही यावेळी शरद पवारांनी आवाहन केलं.