पुणे - पुण्यातील धनकवडी येथे एका तरुणाने सेक्सटॉर्षणमुळे आत्महत्या ( Suicide due to sextortion ) केली असल्याची घटना ताजी असताना पुण्यात पुन्हा एकदा अशीच एक घटना दत्तवाडी ( Dattawadi suicide ) परिसरात घडली आहे. पुण्यातील दत्तवाडी भागात राहणाऱ्या 19 वर्षीय प्रितम गायकवाड ( नाव बदलेले आहे ) या तरुणाच प्रीत यादव या तरुणी सोबत इन्स्टाग्रामवर ( Instagram ) ओळख झाली असताना दोघांमध्ये ओळख झाल्यावर त्याने तिला अर्धनग्न फोटो पाठवले. त्यानंतर त्या तरुणीने पैसे दे अन्यथा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून या 19 वर्षीय प्रितम गायकवाड या तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रितम गायकवाड वय 19 रा. दत्तवाडी असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
ऑनलाईन अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी- दत्तवाडी परिसरातील अनंत कुमार सोसायटीमध्ये प्रितम गायकवाड हा 19 वर्षीय तरुण राहण्यास होता. तो सोशल मीडिया सक्रिय होता. प्रितम याची इन्स्टाग्रामवर प्रीत यादव असे आयडी असलेल्या तरुणीशी ओळख झाली. तर त्याच दरम्यान प्रीत यादव हिने प्रितम गायकवाडला अर्धनग्न फोटो मागितल्यावर त्याने तिला शेयर केले. त्यानंतर मला पैसे दे,अन्यथा तुझे अर्धनग्न फोटो व्हायरल करेल, अशी धमकी प्रीत यादव हिने दिली. त्यावर त्याने 4 हजार 500 रुपये ऑनलाईन दिले. त्यानंतर देखील सतत पैसे मागवू लागल्याने या सततच्या त्रासाला कंटाळून प्रितमने सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास राहत्या असलेल्या इमारतीवरून उडी मारली. त्यानंतर त्याला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
30 सप्टेंबरला धनकवडी परिसरात घडली अशीच घटना... पुण्यातील धनकवडी येथे ऑनलाइन ओळख झालेल्या तरुणीने तरुणाचा नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी ( Threat of uploading nude videos on social media ) देत सातत्याने खंडणीची मागणी केल्याने अमोल राजू गायकवाड (रा. तानाजी नगर, धनकवडी) या तरुणाने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
तरुणांनो सावधान - दोन अज्ञात मोबाईल धारकांकडून अमोल गायकवाड यांच्या व्हाट्सअपवर मेसेज येण्यास सुरुवात झाली. मेसेज आलेल्या क्रमांकावर एका महिलेचा डीपी होता. त्यानंतर या महिलेने तरुणासोबत चॅटिंग सुरू केले. त्यानंतर संबंधित तरुणास न्यूड कॉल केले. त्यानंतर तरुणास ते व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या महिलेने त्याच्याकडे पैशांची मागणी करून वेळोवेळी पैसे घेऊन मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्या तरुणाला याचा त्रास होऊ लागला. अखेर तिला संदेश पाठविला की, 'मैं सुसाईड करा रहा हूँ'. त्यावर तिने 'करो सुसाईड, मैं सोशल मीडियापर व्हीडीओ व्हायरल कर रही हूँ', अशी धमकी देऊन पैशांची मागणी केली. तरुणीच्या धमक्यांमुळे अमोल ने ३० सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.