पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून १० वी आणि १२ वीच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर आज महामंडळाच्यावतीने खुलासा करण्यात आला आहे. १० १० वी आणि १२ वीच्या परीक्षा या ऑनलाईन नव्हे ( SSC HSC Online Exam Demand Rejected In Maharashtra ) तर, ऑफलाईन पद्धतीनेच होणार ( SSC HSC Exams Offline In Maharashtra ) असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाचे ( Maharashtra State Board of Secondary Higher Secondary Education ) अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
परीक्षेचा कालावधी
मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार १२ वीची परीक्षा २० फेब्रुवारी दरम्यान व १० वीची परीक्षा १ मार्च दरम्यान सुरु करण्यात येते. पण चालू वर्षी नेहमीपेक्षा सुमारे दोन आठवडे उशिराने म्हणजेच १२ वी लेखी परीक्षा दि. ४ मार्च ते ३० मार्च दरम्यान होणार आहे. श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन १४ फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत होणार आहे. आणि १० वीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत होणार आहे. श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन दि. २५ फेब्रुवारी ते १४ मार्चपर्यंत होणार आहे. यंदा १२ वीच्या परीक्षेसाठी १४ लाख ७२ हजार ५६२ एवढे विद्यार्थी तर १० वीच्या १६ लाख २५ हजार ३११ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, असं देखील यावेळी गोसावी यावेळी म्हणाले.
एका वर्गात २५ विद्यार्थी
दरवर्षी १० वी आणि १२ वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे क्रमांक हे विविध शाळेत लागत असतात. पण यंदा कोरोनाच्या पश्वभूमीवर ज्या शाळेत विद्यार्थी शिकत आहेत त्याच शाळेत विद्यार्थ्याला परीक्षा देता येणार आहे. परीक्षेत एक आड एक विद्यार्थी बसविण्यात येणार आहे. एका वर्गात 25 विद्यार्थीच बसविण्यात येणार आहेत, असं देखील यावेळी गोसावी म्हणाले.
व्हॅक्सिन कंपल्सरी नाही
१० वी आणि १२ वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना व्हॅक्सिन कंपल्सरी नसून, जास्तीत जास्त विद्यर्थ्यांनी लसीकरण करून घ्याव असं आवाहन देखील मंडळाच्यावतीने करण्यात आलं आहे. परीक्षेच्या काळात जर एखाद्या विद्यार्थाला कोरोनाची लागण झाली तर परीक्षेनंतर म्हणजेच निकाल लागल्यानंतर लवकरात लवकर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येईल, असं देखील यावेळी गोसावी म्हणाले.
यंदा अर्धा तास आधी परीक्षा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना लिखाणाची सवय कमी झाल्याने यंदा होणाऱ्या सकाळच्या सत्रातील लेखी परीक्षा ही अर्धा तास आधी होणार आहे. विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी असल्यामुळे लेखी परीक्षेच्या ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे जादा वेळ तसेच ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटांचा जादा वेळ देण्यात आला आहे.
अभ्यासक्रमात २५ टक्के कपात
कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यापूर्वीच अभ्यासक्रमात २५% कपात करण्यात आली आहे. त्यामुळे लेखी परीक्षेचे आयोजन ७५% अभ्यासक्रमावर करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येतील.
प्रात्यक्षिक परीक्षा
कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे बहुसंख्य शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना निर्धारित प्रात्यक्षिक कार्ये पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना याबाबत सवलत देण्यात आलेली आहे. इ. १२ वी प्रात्यक्षिक कार्य हा भविष्यातील अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. ही परिस्थिती लक्षात घेता उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत प्रात्यक्षिकासाठी विषयनिहाय अभ्यासक्रमाच्या किमान ४०% प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. इ.१० वीसाठी शाळांमार्फत प्रात्यक्षिकासाठी विषयनिहाय अभ्यासक्रमाच्या किमान ४० % प्रात्यक्षिकांवर आधारित परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन शक्य न झाल्यास प्रात्यक्षिकाऐवजी लेखन कार्यावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन केले जाईल. किमान ४०% च्या मर्यादेत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षेसाठी प्रयोग निवडण्याची लवचिकता असेल. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अंतर्गत व बहिःस्थ परिक्षक संबधित शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामधून नियुक्त करण्यात येणार आहेत, असं देखील यावेळी गोसावी म्हणाले.
विशेष सवलत
कोणताही विद्यार्थी आजारी पडल्यास किंवा अपरिहार्य कारणामुळे श्रेणी, तोंडी परीक्षा अंतर्गत व तत्सम मूल्यमापन प्रात्यक्षिक/ सबमिशन करू न शकल्यास लेखी परीक्षेनंतर इ. १० वी आणि इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना यासाठी पुन्हा संधी देण्यात येईल. यासाठी वेगळे शुल्क घेतले जाणार नाही.
विद्यार्थ्यांना १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका
कोविड- १९ च्या संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर किमान एक ते दिड तास अगोदर उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात येईल. विद्यार्थ्याला १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जाईल. यामुळे ती सोडविण्याबाबत त्याला नियोजन करता येईल.