पुणे - देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन यांच्यासह अनेक भाजप नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा आरोप असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना राज्य सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांच्याविरोधातील खटल्यातून हटवले आहे. त्यांच्या जागी या खटल्यात अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा - Increase In Rickshaw Fare : 1 ऑगस्टपासून रिक्षा प्रवास महागणार, मोजावे लागणार एवढे पैसे
प्रवीण चव्हाण यांची राज्यातील अनेक महत्त्वाच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून आघाडी सरकार काळात नेमणूक झाली होती. जळगाव मधील दाखल गुन्हा पुण्यात वर्ग करून त्यामध्ये गिरीष महाजन यांना मोक्का लावण्याचा कट केल्याचा चव्हाण यांच्यावर आरोप करण्यात आला होता. चव्हाण यांच्याकडे डीएसके, रवी बर्हाटे, शिक्षक भरती घोटाळा, असे अनेक प्रकरणे आहेत.
महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांवर सूड उगविण्याचे षडयंत्र रचत आहेत. साक्षिदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे मॅनेज केले जात आहे, असा आरोप तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. तसेच, त्यांनी हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना आहे आणि सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत आहेत, असा आरोप करत 125 तासांच्या स्टिंग ऑपरेशनचे फुटेज विधानसभेत जमा केले आहे. सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून फडणवीस यानी सादर केला होता.
हेही वाचा - पुणे जिल्ह्यात निवडणुकांचा धुरळा उडणार; २८४ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत शुक्रवारी