पुणे - दीड वर्षाच्या लहान बाळाला पळवून नेणाऱ्या आरोपीस सहकारनगर पोलिसांनी लातुर जिल्ह्यापर्यंत पाठलाग करुन अटक केली. या बाळास सुखरुप आईच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी बाळाच्या आईने सहकार नगर पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पो.नि.स्वाती देसाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीस शिताफीने अटक केले. राणी अमोल गुळुमकर, (वय २७) राहणार बारामती असे बाळाच्या आईचे नाव असून कार्तीक असे बाळाचे नाव आहे. पुण्यातील सहकार नगर पोलिसांची स्तुत्य कमागिरीचे कौतूक सर्वत्र होत आहे.
आईस रुममध्ये कोंडून मुलास पळवले - राणी या 1 एप्रिल बारामतीवरून आरोपी सुनिल सोपान पांढरे (वय २६) यांच्याबरोबर पुण्यात फिरायला आल्या होत्या. ते सर्वजण बालाजीनगरमधील एका लॉजमध्ये राहुन पुणे शहरातील दगडुशेठ गणपती, कात्रज सर्पोद्यान, स्वामी नारायण मंदीर येथे फिरुन पुन्हा लॉजमध्ये राहत होते. 3 एप्रिलला आरोपींने पांढरे याने राणी गुळमकर यांना मारहाण करुन रुममध्ये कोंडुन त्यांचे लहान मुलास पळवुन घेवुन गेला. पोलिसांनी तपास करत या आरोपीला अटक केली आहे. सुनील सोपान पांढरे, असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीस अटक - सहकारनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार करीत असताना तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे यांनी फिर्यादी यांच्याकडुन अधिक माहिती घेवून तांत्रीक माहितीच्या आधारे तपास करण्यास सुरुवात केली.त्यानंतर लहान बाळाला पळवून नेणारा आरोपी सुनील सोपान पांढरे हा बाळासह त्याच्या मुळगावी जात असल्याचे व सध्या तो अहमदपुर लातुर या दरम्यान असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक छबु बेरड व तपास पथक अहमदपुर लातुर येथे रवाना झाले. त्यांनी लातूर येथे जाऊन जावुन आरोपीला लहान बाळासह ताब्यात घेवुन त्याला सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणले व बाळास सुखरुपपणे त्याची आईच्या ताब्यात दिले.