पुणे - राज्यात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर धार्मिकस्थळे खुली करण्यात आली आहेत. राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुनच मंदिर, मशीद, चर्चमध्ये भाविकांना प्रवेश दिला जावा, अशा सूचना देखील राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. मंदिर खुली होऊन आज तीन दिवस होत असताना राज्यातील प्रसिद्ध मंदिरामध्ये कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे मंदिर प्रशासनाकडून, भाविकांकडून पालन होते का, सध्या काय परिस्थिती आहे, याचा ईटीव्ही भारतकडून आढावा घेतला याच अंतर्गत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात काय परिस्थिती आहे याचा घेतलेला आढावा.
अनलॉकनंतर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील परिस्थिती
पाडाव्यापासून मंदिरे खुली होत असताना पहिल्याच दिवशी श्रीमंत दगडूशेठ मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती आणि गेले तीन दिवस बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक सकाळपासून येत असल्याचे पाहायला मिळाले. लॉकडाऊनपूर्वी मंदिरात भाविकांच्या होणाऱ्या गर्दीइतकी गर्दी जरी आता जाणवत नसली तरी भाविक लक्षणीयरित्या मंदिरात येत असल्याचे याठिकाणी दिसून आले. दरम्यान कोरोना पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या नियमांचे या ठिकाणी काटेकोर पालन होत असल्याचे दिसून आले.
अनलॉकनंतर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील परिस्थिती भाविकांना सोशल डिस्टसिंग ठेवून दिला जातो मंदिरात प्रवेश -भाविकांकडून देखील नियमांचे तंतोतंत पालन केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अगदी रांगेपासून ते बाप्पाचं दर्शन घेण्यापर्यंत प्रत्येक काळजी घेतली जात आहे. रांगेतून मंदिरात प्रवेश करताना प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिग केलं जाते, हात सॅनिटाइझ करूनच भाविकांना आत सोडले जाते. दर्शन रांगेत सहा फुटांच्या अंतरावर मार्क केले असून सुरक्षित अंतर रहावे म्हणून प्रत्येकाला मार्किंग केलेल्या ठिकाणी थांबवून पुढे सोडले जाते. मंदिरात हार, फुले, नारळ बाप्पाला अर्पण करण्यास पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे या काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मंदिर प्रशासनाकडून नियमांची कडेकोट अंमलबजावणी केली जात आहे.
अनलॉकनंतर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील परिस्थिती मंदिर प्रशासनाने तीन टप्प्यात मंदिर अनलॉक करण्याचे केले नियोजन -दरम्यान मंदिर प्रशासनाने तीन टप्प्यात मंदिर अनलॉक करण्याचे ठरवले असून पहिल्या टप्प्यात फक्त भाविकांना मंदिरात प्रवेश आणि दर्शन, दुसऱ्या टप्प्यात फुलं, हार, नारळ, प्रसाद यांना परवानगी दिली जाणार तर तिसऱ्या टप्प्यात मंदिरात भाविकांना बसू दिले जाणार तसेच होम, यज्ञ, पूजा याला परवानगी दिली जाणार आहे.