पुणे - राज्य शासनाने 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवरायांचे लोककल्याणकारी कार्य प्रेरणादायी तसेच नवी ऊर्जा देणारे आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज केले. तर, महाराष्ट्राच्या इतिहासात आजचा दिवस हा सर्वात मंगलमय दिवस आहे. 'शिवस्वराज्य दिन' सोहळा उत्कृष्टपणे साजरा करण्यावर आपला भर असून लवकरच हा उत्सव जागतिक उत्सव बनेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - मराठा आरक्षणाबाबत काही जणांकडून समाजाला भडकवण्याचा काम - अजित पवार
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीओईपी) स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार गिरीष बापट, नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, महाविद्यालयाचे प्राचार्य बी.बी. अहुजा, व्याख्याते प्रा.नितीन बानुगडे पाटील उपस्थित होते.
सारेच वातावरण शिवमय होऊन गेले
एसएसपीएमएस संस्थेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ स्मारक, तसेच शिवराज्यभिषेक शिल्पाचे पूजन विधानपरिषदेच्या उपसभापती गोऱ्हे व शिक्षणमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली. यावेळी मालोजीराजे छत्रपती, शिवजयंती महोत्सव समितीचे अमित गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. सारेच वातावरण जणू शिवमय होऊन गेले होते.
हा उपक्रम विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल
विधानपरिषदेच्या उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, 'शिवस्वराज्य दिन' साजरा करण्याचा राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व विचार सातत्याने आपल्यासमोर असतील, ज्या विचारातून आपल्याला कायम प्रेरणा मिळते. यासोबतच शासनाने गडकिल्ल्यांच्या रक्षणासाठीही कार्यक्रम हाती घेतला आहे. 'शिवस्वराज्य दिन' कार्यक्रम प्रत्येक शाळा, महाविद्यालयांत साजरा होत असल्याने विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढील वर्षीचा शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात आजचा दिवस हा सर्वात भाग्याचा दिवस आहे. दरवर्षी ‘६ जून’ हा दिवस राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांत हा दिवस कोविडचे नियम पाळून साजरा करण्यात येत आहे. शिवस्वराज्य दिनानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, कोविड आटोक्यात आल्यानंतर पुढील वर्षीचा शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नक्कीच प्रेरणा देतील
खासदार गिरीश बापट यांनी 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याच्या राज्य शासनाच्या निणर्याचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा. विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नक्कीच प्रेरणा देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी कोरोना नियम पाळून प्राध्यापक, तसेच विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.
हेही वाचा - पुण्यात सोमवारपासून अनलॉकची नवीन नियमावली