पुणे - एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून राज्यातील स्थानिक पातळीवर आघाडीसाठी प्रयत्न केल जात आहेत. तर दुसरीकडे राज्यातील विविध जिल्ह्यात आघाडीत बिघाडी पाहायला मिळत आहे. असंच काहीसं चित्र पुणे शहरातही दिसत आहे. पुण्यातील कोंढवा येथील वाहतूक कोंडी (Traffic at Kondhava) कमी व्हावी यासाठी आज शिवसेनेच्यावतीने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांविरोधात (Shivsena Protest) विमान उडवत प्रतिकात्मक रोप वे तयार करत आंदोलन करण्यात आले.
- विमान उडवत प्रतिकात्मक रोप वे तयार करत करण्यात आले आंदोलन -
कोंढवा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात चौकाचौकात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. स्थानिक नगरसेवक या वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करत असून, फक्त आश्वासनांचा पाऊस येथील जनतेला देत आहेत. कोंढवा परिसर हा वाहतूकमुक्त व्हायला हवा, यासाठी आज माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्यावतीने अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. एकतर वाहतूक कोंडी मुक्त करा, अन्यथा आम्हाला जाण्यायेण्यासाठी विमान किंवा रोप वे बांधून द्या, अशी मागणी देखील यावेळी बाबर यांनी केली.
- लवकरात लवकर कोंढवा वाहतूक मुक्त करावे -
एकीकडे पुणे शहर स्मार्ट होत असताना कोंढाव्यातील समस्या काही सुटताना दिसत नाहीत. 2 ते 3 मिनिटांच्या रस्त्यांसाठी वाहतूक कोंडीमुळे अर्धाअर्धा तास थांबवे लागत आहे. स्थानिक नगरसेवक असो की महापालिका प्रशासन याकडे नेहेमीच दुर्लक्ष करत आहेत. आम्हा कोंढवावासीयांना या वाहतूक कोंडीपासून लवकरात लवकर मुक्तता मिळावी अशी मागणी देखील यावेळी स्थानिक नागरिकांनी केली आहे.