पुणे - गेल्या काही दिवसांपासून मनसेचे नेते वसंत मोरे हे पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत घेतलेल्या निर्णयावर नाराज होते. त्यामुळे शहर अध्यक्ष पदावरून त्यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर आता वसंत मोरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. याभेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलं ( Sanjay Raut Meets MNS Vasant More ) आहे.
राज ठाकरे यांनी मागच्या महिन्यात मशिदीवरील भोंग्याबाबत भूमिका मांडल्यावर वसंत मोरे यांनी उघडउघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे शहराध्यक्ष पदावरून मोरेंना बाजूला व्हावे लागले. त्यानंतर पक्षांतर्गत होणार्या घडामोडीवर देखील आजवर नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. आता त्याच दरम्यान शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत हे पुण्यातील शिवसेनेच्या माजी नगरसेविका संगीता ठोसर यांच्या मुलाच्या लग्नाला आले होते. त्यावेळी वसंत मोरे यांची भेट राऊत यांच्याबरोबर झाली. तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा देखील झाली. यामुळे वसंत मोरे हे मनसेमधून शिवसेनेत जाणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.
याभेटीनंतर बोलताना वसंत मोरे म्हणाले की, मी एका लग्न सोहोळ्याकरीता गेलो होतो. त्यावेळी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे होते. त्यांनी संजय राऊत यांना सांगितले, वसंत मोरे आहेत. आमच्यामध्ये चांगली चर्चा झाली. तसेच, त्यांनी माझ्या कामांच कौतुक केलं. 'तात्याची भेट दुर्मिळ झाली', असेही राऊत यांनी म्हटल्याचे मोरे म्हणाले.
हेही वाचा - Sachin Vaze : सचिन वाझे माफीचा साक्षीदार; अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार