पुणे - ईडीची कारवाई आणि अजित पवारांनी तडकाफडकी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. अजित पवार यांनी राजीनामा देण्याआधी किंवा दिल्यानंतरही माझ्याशी चर्चा केली नव्हती. मात्र, माझे नाव बँक घोटाळा प्रकरणात आल्यामुळे अस्वस्थ होऊन त्यांनी राजीनामा दिला असल्याची शक्यता आहे. मात्र, त्यांचे आणि माझे बोलणे झाले नसल्याने स्पष्ट काही सांगू शकत नाही, असे शरद पवार यांनी आज स्पष्ट केले.
राजकारणाची पातळी घसरल्याचे अजित पवारांचे मत..
शरद पवार हे महाराष्ट्र राज्य बँकेचे सभासद नसतानाही त्यांच्यामागे चौकशीचं शुक्लकाष्ट लागले, हे मला सहन होत नाही. राजकारणाची पातळी घसरलीय. त्यामुळे यातून बाहेर पडलेले बरे. अशी चर्चा अजित पवार यांनी मुलांशी केली. त्यानंतर त्यांनी राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. मात्र, यासंदर्भात त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
उदयनराजेंच्या मानसिक परिस्थितीमध्ये भर टाकायची नाही..
उदयनराजे भावूक झाल्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे असे विचारले असता, मला उदयनराजेंच्या मानसिक परिस्थितीत भर टाकायची नाही असे म्हणत त्यांनी त्याबद्दल भाष्य टाळले.
यासोबतच, रोहीत पवार निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय आधीच झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे पुण्यात गंभीर परिस्थिती होती, त्यामुळे मुंबई सोडून पुण्याला आलो..
आधीच आपल्याला पोलिसांनी ईडीच्या कार्यालयात न जाण्याची विनंती केली होती. त्यातच, अतिवृष्टीमुळे पुण्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे साहजिकच पुण्याला येणे जास्त महत्त्वाचे होते त्यामुळे पुण्याला आलो असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.