पुणे - शहरात शाळा सुरू करण्याबाबत 13 डिसेंबरपर्यत निर्णय घेतला जाणार होता. त्यानुसार पुण्यात 3 जानेवारीपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. त्यावेळी पुणे शहरात शाळा 14 डिसेंबरपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता शाळा बंदचा कालावधी आणखी वाढवण्यात आला आहे. याबाबतची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
हेही वाचा -'...तर 10 हजार शेतकऱ्यांसह दिल्लीत पुन्हा धडक देऊ'
निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला होता
राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला होता. त्यानुसार पुणे महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबत 13 डिसेंबरनंतर निर्णय घेतला जाईल, असे महापौरांनी जाहीर केले होते.
संमतीपत्रासाठी पालकांचा अल्प प्रतिसाद
पुणे शहरात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी एकंदरीत परिस्थिती पाहता 14 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमतीपत्र मागवण्यात आले होते. त्याला अल्प प्रतिसाद मिळाला असून, फार थोड्या पालकांनीच संमतीपत्र दिल्याने पालकांचाही शाळा सुरू करण्याला प्रतिसाद नसल्याचे दिसून आले, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत एकूणच परिस्थितीचा विचार करून याबाबत आयुक्तांशी चर्चा करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले.
हेही वाचा - संतापजनक..! बेळगावच्या रायबागमध्ये महिलेवर अॅसिड हल्ला
दरम्यान, 3 जानेवारीला कोरोना स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.