पुणे- आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ बुधवार ११ डिसेंबरपासून सुरु होत आहे. महोत्सवाचे यंदाचे हे ६७ वे वर्ष असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे १५ डिसेंबरपर्यंत महोत्सव रंगणार आहे.
या महोत्सवासाठी २७० बाय २२८ फूट इतका मांडव तयार करण्यात आला असून या ठिकाणी तब्बल १० हजार रसिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय बैठक आणि खुर्च्या अशा स्वरूपात ही बैठक व्यवस्था असणार आहे. याशिवाय संपूर्ण मंडपात ६ एलईडी स्क्रीन्सवर देखील रसिकांना महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे.
यांच्या गायनाने होणार महोत्सवाची सुरूवात-
किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायक पंडित हिरो दस्तुर यांची यंदा जन्मशताब्दी आहे. त्याचे औचित्य साधत त्यांचे शिष्य गिरीश संझगिरी त्यांना गायनातून आदरांजली वाहतील. यासोबतच आजच्या पहिल्या दिवशी जयंती कुमरेश यांचे कर्नाटक शैलीतील वीणावादन होईल. त्यानंतर पंडित माणिक वर्मा यांच्या शिष्या अर्चना कान्हेरे यांचे गायन होईल. आणि आजच्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या वादनाने होणार आहे.