पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यापीठाकडून साहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेली राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षा युजीसी अंतर्गत असते. पुणे विद्यापीठाकडून ही परीक्षा घेण्यात येते. यावर्षी सेट परीक्षा 28 जूनला होणार होती. मात्र, कोरोनाचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पुण्यात देखील कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होतोय. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
केंद्र सरकारने लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू केला आहे. यामध्ये अन्य ठिकाणी वाहतुकीसाठी शिथिलता आली आहे. मात्र अद्याप पुणे रेड झोनमध्ये असल्याने त्या ठिकाणी नियम कडक आहेत. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्याने सध्या कन्टेन्मेंन्ट झोन देखील वाढले आहेत. अशा परिस्थितीत नियोजित सेट परीक्षेचे आयोजन करणे शक्य नसल्याने विद्यापीठाने ही परीक्षा पुढे ढकलल्याचे बुधवारी जाहीर केले.
परीक्षेची पुढील तारीख कोरोनाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. पुढील काळात कोरोनाच्या संसर्गाची परिस्थिती कशी असेल, याचा विचार करून वेळापत्रक जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.