पुणे - आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने समाजात मोठी नाराजी आहे. यावर तातडीने मार्ग काढला नाही, तर मराठा तरुण नक्षली मार्गाला जातील, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. संभाजी ब्रिगेडने पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावर भूमिका मांडली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेड संघटनेने दिला आहे. संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य विकास पासलकर म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने अन्याय झाला आहे. ते म्हणाले, की आरक्षणासाठी लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. तेव्हा ५०पेक्षा जास्त मराठा तरुणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले. मात्र, आता पुन्हा समाजावर अन्याय झाला आहे.
आरक्षणाला स्थगिती म्हणजे राज्यातील महाआघाडी आणि केंद्र सरकार व महाराष्ट्र भाजपा यांच्यातील राजकारणाचा हा बळी आहे. त्यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा झाल्याचा आरोप पासलकर यांनी केला. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली.