पुणे - मागील दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे. पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर दहाहून अधिक गुन्हे दाखल आहेत.
- बऱ्हाटेवर दहाहून अधिक गुन्हे आहेत दाखल -
जमीन व्यवहारात अनेक नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून रवींद्र बऱ्हाटे आणि त्याच्या साथीदारा विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) नुसार कारवाई केली आहे. मागील दीड वर्षापासून तो फरार होता. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी रवींद्र बऱ्हाटे याची पत्नी संगीता बऱ्हाटे आणि मुलाला अटक केली आहे. तर रवींद्र बऱ्हाटे याला व्हिडिओ तयार करण्यासाठी मदत केल्याच्या आरोपावरून पितांबर धिवार याला देखील अटक केली आहे.
- बऱ्हाटेने फेसबुक लाईव्ह करून पोलिसांवर आरोप केले होते -
मागील दीड वर्षापासून पोलीस रवींद्र बर्हाटेच्या मागावर होते. परंतु तो पोलिसांना गुंगारा देत होता. फरार असतानाही बऱ्हाटे याने फेसबुक लाईव्ह करून पोलिसांवर आरोप केले होते. या व्हिडिओद्वारे त्यांनी साक्षीदार, तक्रारदार आणि तपास अधिकारी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यासोबतच विविध आरोप देखील केले होते. दरम्यान, तो फेसबुक लाईव्ह करत असल्यामुळे पोलिसांवरच प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतु आज अखेर त्याला अटक करण्यात आली.
- रवींद्र बऱ्हाटे याच्या घरावर छापा टाकला होता -
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी रवींद्र बऱ्हाटे याच्या राहत्या घरावर छापा टाकला होता. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात जमिनीची कागदपत्रे, कोरे चेक सापडले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर त्याच्या काही मालमत्ता देखील जप्त करण्यात आल्या होत्या.