पुणे - लॉकडाऊनमुळे अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले. तर अनेक जणांचे व्यावसाय देखील संपले. लॉकडाऊनच्या काळात एक अशी व्यक्ती होती ज्याने कोरोना काळातली दोन वर्षे रिक्षामध्ये झोपून काढली. आजही हा व्यक्ती रिक्षामध्ये झोपत आहे. स्वतःचा जीव मुठीत धरून त्याने हे दिवस काढले. त्याचे नाव संतोष दिवटे. हातावर पोट असणारे संतोष दिवटे हे रिक्षा चालक आहेत. कोरोना काळात घर चालवनही अवघड झाले. कारण सर्व वाहतूकही बंद होती. घरगुती कारणामुळे घर सोडले. पण बायका मुलांना खायला घालायचे काय? खिशात पैसे नसल्याने घर भाड्या अभावी भाड्याचे घर सोडावे लागले. त्यामुळे आणखी टेंशन वाढले. पत्नी आणि मुलाला पत्नीच्या माहेरी सोडले. सासुरवाडीला रहायचे तर तेथील परिस्थिती देखील जेमतेम त्यामुळे तिथे राहणेही योग्य वाटत नव्हते. त्यामुळे शेवटी राहायचे कुठे हा प्रश्न होताच? त्यामुळे त्यांना रिक्षालाच आपले घर बनविले. ते आजही रिक्षातच झोपतात.
शेवटी जी आपली कर्मभूमी आणि नेहेमीच आपल्या बरोबर असते ती म्हणजे रिक्षा. लॉकडाऊनमध्ये तर रिक्षा उभीच होती. याच रिक्षामध्ये राहण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन होते बाहेर फिरण्यास मनाई होती. मग काय लपून छपून रहदारीच्या सुरक्षित ठिकाणी म्हणजे पेट्रोल पंप, एसटी स्टँड, एटीएम अशा रहदारीच्या ठिकाणी रिक्षा पार्क करून झोपू लागलो. त्याच काळात जेवणाचे देखील हाल. उपाशी राहून दिवस काढायला लागले. कधी कधी तर खिशात वडापावसाठी देखील पैसे नव्हते. मग पोट तर भरायचे. मग मंदिराबाहेर जे प्रसाद वाटप करायचे त्या ठिकाणी जाऊन जे खायचे. त्यावेळी रडावं की हसावं हा असा प्रश्न उपस्थित झाला होता, अशी भावना संतोष दिवटे यांनी व्यक्त केली आहे.
रिक्षामध्ये राहायचे म्हटल्यावर झोपण्यासाठी लागणार सर्व साहित्य ठेवलेले होत. मात्र नंतर रिक्षावाला फोरम या संघटनेतील माझ्या मित्रांना माझी परिस्थिती समजली. त्यांनी मला मोठा आधार दिला. आज मी जगतो आहे ते फक्त रिक्षा वाला फोरममुळे. मी आजही रिक्षातच झोपतो. कारण घराचे भाडे देण्यासाठी माझ्याकडे अद्यापही पुरेसे पैसे नाहीत. तर बायका मुलांना काय खायला घालू. माझ्या मुलांसाठी खूप काही करायचे आहे. त्यामुळे हळू हळू पैशांची बचत करून बायका मुलांसाठी घर घेऊन त्यांच्यासाठी जगण्याची इच्छा संतोष दिवटे यांनी यावेळी व्यक्त केली आहे.