पुणे : काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल विधान केलं होतं. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आक्रमक झाले. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governer Bhagatsingh Koshyari ) यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काहीही समज नाही. त्यांना बघितलं ना ते कसे आहेत. कुडबुडे ज्योतिष जसे असतात तसे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे रामदास स्वामी कधीही गुरू नव्हते हे त्यांनीही सांगितलं आणि रामदास स्वामी यांनी देखील. पण तरीही आज अश्या पद्धतीचे वक्तव्य केले जात आहे. रामदास स्वामी यांनी जे शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहिलं आहे ते अतिशय उत्तम असून, ते मी माझ्या घरात लावलं आहे असं यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुण्यात पहिल्यांदाच वर्धापनदिन
राज ठाकरे हे शिवसेनेमधून बाहेर पडल्यावर 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.आज या पक्षाला 15 वर्ष पूर्ण होऊन 16 व्या वर्षात पक्षाने पदार्पण केलं आहे. दरवर्षी मुंबईत होणारा वर्धापनदिन यंदा प्रथमच पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ( MNS Anniversary Pune ) झाला. यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक हे उपस्थित होते.
तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करा
आपण आपले सण हे नेहेमी तिथी प्रमाणेच साजरा करत असतो. मग ते गणेशोत्सव असो की गुढीपाडवा. तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही नेहेमी तिथी प्रमाणेच साजरी केली पाहिजे. 21 मार्चला राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी करावी. तारखेने की तिथीने शिवजयंती साजरी करण्याच्या विषयापेक्षा वर्षभर शिवजयंती साजरी करा असं देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले.
संजय राऊत यांची उडवली खिल्ली
सध्या राज्यात काय चाललं आहे कोणालाच कळत नाही. सत्ताधारी म्हणत आहे की, आम्हाला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधक देखील तेच बोलत आहेत. मग शिल्लक कोण राहील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना? सध्या राजकारणाची पातळी घसरली असून, खालच्या पातळीवर जाऊन टिका केल्या जात आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांचा उल्लेख करत आणि त्यांची मिमिक्री करत राज ठाकरे यांनी यावेळी त्याची खिल्ली उडवली.
मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे निवडणूक लांबणीवर
मी नोव्हेंबरपासून सांगत आहे की, निवडणूक ही मार्चमध्ये होणार नाही. निवडणूक आली की ती चढायला लागते. वातावरणात निवडणूक यायला लागते. मला वातरणात निवडणूक दिसत नव्हती. निवडणूक लांबविण्यासाठी ओबीसी समाजाचे कारण पुढं केलं. हे सगळं खोटं असून, त्यांना निवडणूक घ्यायचीच नव्हती. मुख्यमंत्र्यांची ( CM Uddhav Thackeray ) तब्येत ठीक नाही हे निवडणूक लांबनीच मुख्य कारण आहे. पालिका निवडणुका या 3 महिन्यानंतर होणार नाही तर त्या दिवाळीनंतर होतील, असं देखील यावेळी ठाकरे यांनी सांगितलं.
महिन्यातून दोन दिवस लॉकडाऊन लावला पाहिजे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची कोणालाच काहीही कल्पना नव्हती. कोणीही विचार केला नव्हता की, अशी परिस्थिती येईल. सगळीकडे शांतता पसरली होती. फक्त आणि फक्त प्राण्याचे आवाज येत होतं. यावेळी कोकिळा कु कू च्या ऐवजी कोविड कोविड ओरडत होते. पण आत्ता पुन्हा गर्दी सुरू झाली. कधीकधी अस वाटत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहावं आणि सांगावं की महिन्यातून दोन दिवस लॉकडाऊन लावा, असं देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की, आजचे भाषण हा ट्रेलर असून, मुख्य पिक्चर 2 एप्रिलला गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर होणार आहे, असं देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले.