पुणे - शहरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. संशयित रुग्ण हे रुग्णालयात ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. अशा स्थितीत पुण्यातील एका मशिदीने कोरोना संशयित रुग्णांना विलगीकरण कक्ष म्हणून जागा उपलब्ध करून दिली आहे. संकटकाळात मशिदीकडून संशयित रुग्णांच्या राहण्याची व जेवण्याचीही सोय करण्यात येणार आहे.
पुण्यात 1,200 हून अधिक कोरोनाबधित रुग्ण आहेत. तर 75 हून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. तर संशयित रुग्णांची संख्याही मोठी आहे. या रुग्णांना ठेवण्यासाठी रुग्णालये अपुरी पडत आहेत. त्यामुळे महापालिकेने वेगवेगळ्या संस्था, शाळांमध्ये या रुग्णांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुण्यातील मशिदिने यासाठी पुढाकार घेतला आहे. मशिदीमधील जागा कोरोना संशयित रुग्णांना विलगीकरण (क्वारंटाईन) करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.
रमजानमध्ये घरातूनच नमाज पठण-
सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे. या दिवसात नमाजपठण करण्यासाठी मुस्लिम बांधव मशिदीत एकत्र जमतात. परंतु सध्या उद्भवलेल्या कोरोना विषाणुच्या संकटामुळे नमाज पठण घरातच करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका लक्षात घेता अनेकांनी घरातच नमाजपठण सुरू केले.
हेही वाचा-कोरोना वॉरियर्स ; संचारबंदीत कोरोनाशी लढणाऱ्या पोलिसांसह कुटुंबियांना धोका, सुरू झाली तपासणी . . .
विलगीकरणातील रुग्णांना जेवण्याचीही सुविधा
शहरातील मशिदी सध्या रिकाम्या आहेत. सध्याची गरज लक्षात घेता आझम कॅम्प परिसरातील मशिद क्वारंटाईन रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मशिदीमध्ये 60 पुरुष तर 40 महिला राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली. यामध्ये राहण्यापासून जेवण्याची व अंघोळ करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचा-पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सात दिवसात होतेय दुप्पट
धर्माने दिलेली शिकवण आचरणात!
याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन पी. ए. इनामदार म्हणाले, आजच्या परिस्थितीत प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात लोकांना क्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व लोकांना ठेवण्यासाठी सरकारकडील जागा अपुऱ्या ठरत आहेत. अशी परिस्थिती पाहून आम्ही स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना व महापौरांना मशिदीच्या जागेचा पर्याय सूचवला होता. त्यांनी तो मान्यही केला आहे. त्यानुसार आम्ही 100 लोकांना राहता येईल, अशी जागा उपलब्ध करून दिली. धर्माने दिलेली शिकवण प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे.
पुणे शहरात 9 मार्चला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आणि त्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढच होत गेली. गेल्या काही दिवसात पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ही साधारण सात दिवसात दुप्पट होत असल्याचे निरीक्षण केंद्रीय पथकाने नोंदवले आहे