पुणे - राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron Variant) वाढत आहेत. त्यामुळे राज्यात निर्बंध कठोर लावले जाणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण मुंबईत सापडल्यानंतर, काल पिंपरी चिंचवड येथे सहा तर पुण्यात एक रुग्ण सापडला आहे. ओमायक्रॉनचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होतो असे सांगितले जात आहे. अशातच पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या तुळशीबागेत (Tulshibagh Market Pune) काही नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन केले जात आहे, तर काही नागरिक अजूनही बेफिकीर असल्याचे चित्र दिसत आहे.
- लॉकडाऊन नको, नागरिकांचे मत -
राज्यात ओमायक्रॉनचे एकूण 10 रुग्ण झाले असून, देशात 25 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात निर्बंध कडक लावण्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन लावावे की नाही याबाबत तुळशीबागेतील व्यापारी आणि नागरिकांशी 'ई टीव्ही भारत'ने संवाद साधला. मागील 2 वर्षात लॉकडाऊनचा काय परिणाम होतो हे सर्वांनीच पाहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जर हा व्हायरस वाढला तर लॉकडाऊन करू नये. या व्हायरसला रोखण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केलेच पाहिजे. जे नियमांचे पालन करणार नाही अशा नागरिकांवर कारवाई करण्यात यावी, पण लॉकडाऊन नको, असे मत यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.