पुणे- लाखो रुपये किंमत असलेल्या या दुर्मीळ प्रजातीच्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून जिवंत साप जप्त करण्यात आले आहेत. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. विकास रामचंद्र फडतरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी शंकर कुंभार यांना एक व्यक्ती मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. पोलिसांनी कात्रज परिसरातून विकास फडतरे याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या बॅगची पोलिसांनी तपासणी केली. त्यामध्ये दोन जिवंत मांडूळ प्रजातीचे साप आढळल्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र पाटील यांनी सांगितले.
मांडूळ साप ठरतो अंधश्रद्धेचा बळी
मांडूळ सापाविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत. जादूटोण्यासाठी किंवा औषधासाठी या सापाचा वापर होतो. या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. लाखो रुपये किमतीमध्ये हे साप विकले जातात. आरोपीने हा साप कोणाला विकण्यासाठी आणला होता, कुठून आणला होता याची पोलीस चौकशी करत आहेत.