पुणे - लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असतानाही मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या अनेक पुणेकरांवर पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई केली. वानवडी, स्वारगेट पोलीस स्टेशनसह इतर ठिकाणीही पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये मॉर्निंग वॉकसह परवानगी नसतानाही इतर कामासाठी घराबाहेर पडलेल्या पुणेकरांचा समावेश आहे.
संपूर्ण पुण्याला सध्या कोरोना विषाणूने विळखा घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. परंतु असे असतानाही मॉर्निंग वॉकसाठी अनेक पुणेकर घराबाहेर पडत आहेत. हे यांच्यासह इतरांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वारंवार सांगूनही न ऐकणाऱ्या पुणेकरांना पोलिसांनी आता कारवाईचा बडगा दाखवला आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी मॉर्निग वॉकला निघालेल्या या महाभागांकडून पोलिसांनी भर रस्त्यात व्यायाम करून घेतला.
वानवडी परिसरात 50 ते 60 आणि स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात 60 ते 80 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये मॉर्निंग वॉक आणि भाजीपाला आणण्यासाठी जाणाऱ्या पुणेकरांचा समावेश आहे. पुरुषांबरोबर महिलाही फिरताना आढळून आल्यात. या सर्व नागरिकांना स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात शारीरिक कसरती करायला लावल्या. जोर, उठ बशा, अंगठे धरायला लावले. तर मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना तोंडाला टी-शर्ट बांधायला लावला.
गुरुवारीही (17 एप्रिल) शहरात विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये तेराशे वाहने जप्त करून पाचशे नागरिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, कारवाई करूनही मोकाट फिरणाऱ्यांचे प्रमाण कमी होत नसल्याने पोलिसही त्रस्त झाले आहेत.