पुणे - पुणे मेट्रोच्या कामाने वेग घेतला असून आतापर्यंत निम्मे काम पूर्ण झाले असल्याची माहिती आहे. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गावर मेट्रो धावणार आहे. दरम्यान पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी या मार्गावर गुरुवारी रात्री मेट्रोची चाचणी घेण्यात आली. वनाज ते आयडियल कॉलनी या मार्गावर गुरुवारी रात्री मेट्रो ट्रेन धावली. मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे कामाचा वेग मंदावला होता, तरीदेखील मेट्रोने गुरुवारी रात्री हा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला.
अशी आहे पुणे मेट्रो
या प्रत्येक मेट्रो ट्रेनच्या संचामध्ये 3 कोच असणार आहेत. एका ट्रेनमध्ये 950-970 प्रवासी प्रवास करू शकतात. मेट्रो ट्रेनच्या 3 कोच पैकी 1 कोच महिलांसाठी राखीव असेल. संपूर्ण मेट्रो ट्रेन वातानुकूलित असून त्यामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा पुरवल्या जाणार आहेत. हे तीनही डब्बे एकमेकांना जोडलेले असतील. त्यामुळे प्रवासी एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये सहजरित्या जाऊ शकतील.
ट्रेनचे संच पूर्णतः स्टेनलेस स्टील या धातूपासून बनवले आहेत. वजनाला हलके असलेल्या या संचामध्ये अत्याधुनिक एलईडी प्रकारचे दीवे लावलेले आहेत. बाह्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार आतील दीवे आपोआप कमी-अधिक प्रकाशमान करण्याची यंत्रणाही यात आहे. या ट्रेनचा अधिकतम वेग 90 किमी प्रतितास असणार आहे. ट्रेनमध्ये मोबाईल, लॅपटॉप, चार्जिंग सुविधा असून प्रवाशांसाठी दृकश्राव्य सूचनाप्रणाली असणार आहे.