पुणे- जेईई आणि नीटच्या परीक्षा लांबणीवर टाकाव्यात, यामागणी साठी देशभरात काँग्रेस आणि एएसयुआय यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. पुण्यामध्ये शहर काँग्रेसने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गेटवर आंदोलन करण्यात आले. 17 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने जेईई-नीट परीक्षा पुढे ढकलण्यास नकार दिला होता.
सध्या कोरोना संसर्ग पाहता परीक्षा घेणे संयुक्तिक ठरणार नाही. परीक्षेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक एकत्र येतील आणि संसर्ग आणखी वाढेलस, असे काँग्रेस कडून सांगण्यात आले आहे. परीक्षा घेण्याच्या निर्णयाला काँग्रेससह देशातील विविध राज्यांनी विरोध दर्शवला आहे. मात्र, केंद्र सरकार जेईई-नीट परीक्षा घेण्यावर ठाम आहे.
हेही वाचा-जेईई-नीट परीक्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सहा राज्यांकडून पुर्नविचार याचिका दाखल
विद्यार्थ्यांचा जीव महत्वाचा आहे. कोरोना संकटात परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. यामुळे कोरोना परीक्षा पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असल्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले. कोरोना संकट दूर झाल्यावर परीक्षा घेण्यात याव्यात. परीक्षा घेण्यास आमचा विरोध नाही, असे बागवे यांनी म्हटले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गेटवर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा रद्द करण्यसाठी काँग्रेसकडून देशभरामध्ये जेईई-नीट परीक्षांविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू आहे. यातच आज सर्वोच्च न्यायालयामध्ये 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. 17 ऑगस्टला दिलेल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करण्यात यावा आणि परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी याचिकेत केली आहे.