पुणे - पोलीस दलातील उल्लेखनीय कार्याबद्दल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील 58 पोलिसांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यात पुणे पोलीसातील दहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
दरवर्षी केंद्र सरकारच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कामासाठी पोलीस पदक देऊन गौरवले जाते. यंदाच्या वर्षी प्रसंशनीय सेवेसाठी वायरलेस विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुषमा चव्हाण यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
पुणे पोलीस दलातील परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपअधीक्षक अनिल पाथ्रूडकर, रेल्वेचे पुणे विभागातील पोलीस उपअधीक्षक नरेन्द्र कुमार गायकवाड, दहशतवाद विरोधी पथकाचे पुणे विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील यादव, राज्य राखीव पोलीस दलाचे असिस्टंट कमांडंट सादिक अली सय्यद बिनतारी विभागातील पोलीस अधीक्षक अरविंद आल्हाट यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर करण्यात आले.