पुणे - आगामी पुणे महापालिका निवडणूक ( Pmc Election 2022 ) भारतीय जनता पक्ष खासदार गिरीष बापट ( MP Girish Bapat ) यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. त्यात भाजपा अबकी बार शंभर जागा पार जिंकणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्या 100 जागा जिंकण्याबाबत बोलले जातं आहे. ते संपूर्ण राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत आहे, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil On Pmc Election ) यांनी लगावला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुंबई दौऱ्याबाबत पत्रकारांना विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, 2019 ला देखील अश्याच पद्धतीने तयारी करण्यात आली होती. पण, त्यावेळी काय झाले हे देशाने पाहिले आहे. एरवी प्रशांत किशोर यांचा सल्ला मानणारे आज त्यांचा सल्ला मानत नाही, असेही पाटील यांनी सांगितले.
लई भारी पडेल...
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबाबत बोलताना पाटील यांनी म्हटलं, संजय राऊत यांना परमेश्वर देखील सल्ला देऊ शकत नाही. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक मित्र म्हणून सांगितले की, संजय राऊत हे शरद पवार यांच्या सांगण्यावरुन काम करत आहे. तसेच, विदर्भात जे काही शिवसेनेचे शिल्लक आहे, त्याच देखील राऊत वाटोळ करतील. संजय राऊत यांना माझी भाषा कळेल, ती त्यांच्यापेक्षा भयंकर आहे. मी पाटील आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. लई भारी पडेल, असेही पाटील म्हणाले.