कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. यानंतर हातावर पोट असणाऱ्या मजूर आणि कामगार वर्गाचे हाल होत आहेत. याचप्रमाणे अनेक ठिकाणी रोजंदारीवरील कामगारांना देखील अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही जणांना राहण्याचा प्रश्न होता, तर काहींसमोर पोटाची भूक...मात्र अशा परिस्थितीत सर्व स्तरांमधून गरजूंना मदत करण्यासाठी विविध हात सरसावले आहेत. काहींनी मुख्यमंत्री सहायता निधी तर काही जणांनी थेट गरजवंतांपर्यंत मदत पोहोचवली. काही ठिकाणी सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून मदत पोहोचवण्यात येत आहे. संकटाच्या काळात जो मदतीला धावून येतो तोच खरा मित्र असे म्हटले जाते, या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेऊया गोरगरीब, वंचितांच्या मदतीसाठी धावून आलेल्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांविषयी...
पुणे : सॅनिडायझेशन चेंबर आणि मोफत वैद्यकीय तपासणी
शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सॅनिटायझेशन चेंबरची उभारणी करण्याचे काम बांधकाम व्यवसायिक विशाल गोखले यांच्या पुढाकाराने सुरू आहे. पहिल्या टप्प्यात शिवाजीनगर, प्रभात रस्ता, डेक्कन जिमखाना, पौड रस्ता, कोथरूड, अलंकार पोलीस चौकी व वारजे येथील पोलीस ठाण्यांबाहेर सॅनिटायझेशन चेंबर उभारण्यात आले आहेत. राज्यसभेवरील खासदार वंदना चव्हाण यांच्या निधीतून क्रिएटिव्ह फाऊंडेशनला रुग्णवाहिका देण्यात आली आहे.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पुढाकाराने मतदार संघातील नागरिकांसाठी फिरता दवाखाना सुरू करण्यात आला आहे. शांतीलाल मुथा, भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स यांच्या मदतीने हा दवाखाना सुरू करण्यात आला असून या द्वारे दारोदारी फिरून रुग्णांना वैद्यकीय मदत व सल्ला दिला जात आहे. युवा उद्योजक पुनीत बालन आणि लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी तमाशा कलावंतांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
रेडक्रॉसच्या माध्यमातून कॅम्प परिसरातील न्यू मोदीखाना या भागात मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . या भागातील सुमारे 200 लोकांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली आहेत. तसेच बिबवेवाडी येथील वर्धमानपुरा को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने 5 लाख 71 हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
जळगावात निवारा शेडपासून अन्नाच्या पाकिटांपर्यंत मदत
रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट-ईस्ट, जैन उद्योग समूह, केशव स्मृती प्रतिष्ठान, स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, नाथ फाऊंडेशन, शहर वाळू वाहतूक संघटना, जिल्हा मजदूर फेडरेशन अशा काही महत्त्वाच्या संस्थांनी मदतीचा हात पुढे केलाय. यातील काहींनी गरजूंना मोफत जेवण पुरवले. तर, काही संघटनांनी किराणामाल उपलब्ध करून दिला. तसेच सार्वजनिक मित्र मंडळे गरजूंना अन्नाची पाकिटे, पिण्याचे पाणी, स्थलांतरित मजुरांसाठी निवारा शेड उभारणे अशी मदत करत आहेत. काही संस्था डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी तसेच सफाई कर्मचाऱ्यांसाठी हॅन्डग्लोज, मास्क, सॅनिटायझर वाटप करत आहेत. त्याचप्रमाणे काही दानशूर व्यक्ती आपल्या परीने आर्थिक मदत देखील करत आहेत.
प्रसिद्ध सराफ व्यावसायिक रतनलाल बाफना यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 5 लाख रुपये दिले आहेत. तर त्यांच्या बाफना सुवर्ण पेढीतील कर्मचाऱ्यांनी आपल्या पगारातील काही रक्कम गोळा करत मुख्यमंत्री सहायता निधीला 6 लाख रुपयांची मदत केलीय. जळगाव पीपल को- ऑपरेटिव्ह बँकेने देखील पंतप्रधान सहायता निधीला 5 लाख रुपयांची मदत केली आहे. रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार रक्षा खडसे व उन्मेष पाटलांनी कोरोनाच्या लढ्यासाठी आपल्या खासदार निधीच्या कोट्यातून प्रत्येकी 1 कोटी रुपये पंतप्रधान सहायता निधीला मदत केली आहे.
सांगली : जाती-धर्माच्यापलिकडे जाऊन मदत
जायंट्स क्लब, अल बैतुल माल चॅरिटेबल ट्रस्ट अशा काही सामजिक संघटनांनी घरोघरी जाऊन धान्याचे कीट वाटले. त्याचसोबत जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेला देखील विविध मार्गांनी मदतीचा ओघ सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून २० हजार कुटुंबांसाठी ५ हजार कीट वाटण्याचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार कीटचे वाटप करण्यात आले आहे. भिलवडीतील चितळे उद्योग समूहाकडून दीड कोटींची मदत देण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी तर, पीएम केअर फंडसाठी ५० लाखांचे आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे.
नागपूरात संघ, गुरुद्वारा कमिटी, शिक्षण संस्था सरसावल्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नागरिकांच्या घरी अन्नधान्य आणि किराणा पोहोचवण्यात येत आहे. काही ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलीय. डॉक्टर,नर्सेस आणि कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था सेंटर पॉईंट हॉटेलकडून करण्यात आली आहे. तर साई मंदिर संस्थांनाकडून ३१ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता योजनेत देण्यात आला आहे.
तसेच या ट्रस्ट मार्फत दररोज सात हजार लोकांच्या घरापर्यंत जेवण पोहोचवले जात आहे. याच प्रमाणे गुरुद्वारा कमिटीकडून हजारो लोकांच्या जेवणाची व्यावस्था करण्यात आली आहे. शिवाजी शिक्षण संस्थेकडून देखील ५१ लाखांची आर्थिक मदत मुख्यंमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आली आहे. बीसीएन केबलकडून ११ लाखांचा निधी सीएम रिलीफ फंड मध्ये जमा करण्यात आलाय.