पुणे - बावधन परिसरात चार महिन्याच्या चिमुरडीला उघड्यावर टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज दुपारच्या सुमारास संबंधित घटना उघडकीस आली.
बावधन परिसरात चार महिन्याच्या चिमुरडीला उघड्यावर टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला बावधन परिसरातील निर्जन ठिकाणी कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत लहान बाळ सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. चांदणी चौकापासून काही अंतरावर एक पाण्याची टाकी आहे. याठिकाणी दुपारच्या सुमारास ही चिमुरडी एका झाडाखाली आढळली. चिमुरडीला निर्दयपणे टाकून अज्ञात आरोपींनी पळ काढला. परिसरातून रडण्याचा आवाज ऐकू येत असल्यामुळे काही नागरिकांनी जाऊन पाहणी केली. यानंतर संबंधित घटना उघडकीस आली. नागरिकांनी तत्काळ नियंत्रण कक्षाला यासंबंधी माहिती दिली.
कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित मुलीला ताब्यात घेतले आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.