पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये एक्स-रे मशीनचा स्फोट होऊन एक वर्षीय चिमुकली जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. शार्वी भूषण देशमुख अस जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान, घटनेत आई आणि चिमुकलीचे आजोबा देखील किरकोळ जखमी झाले होते. या घटने प्रकरणी प्रियंका भूषण देशमुख यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यानुसार, डायग्नोस्टिक सेंटरचे व्यवस्थापक, डॉक्टर आणि टेक्निशियन अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवस्थापक गिरीश मोटे, डॉ. सुयोग सोमकुंवर, डॉ. रवींद्र फुलारी, टेक्निशियन अक्षय पाटील, टेक्निशियन अपूर्वा कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शार्वी ही आई आणि आजोबांसह MCU टेस्ट करण्यासाठी न्यूक्लेस डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेले होते. गेल्या महिण्यापासून तिच्यावर सांगवी येथील भालेराव हॉस्पिटल रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या सांगण्यावरून पिंपरीमधील डायग्नोस्टिक सेंटर येथे एक्सरे ची तपासणी करण्यात येत होती. तेव्हा, अचानक एक्सरे मशीन चा काचेचा भाग फुटून आवाज झाला आणि मशीनमधून धूर आणि केमिकल बाहेर निघाले. फुटून आवाज झाल्याने मशीन मधील केमिकल शार्वी च्या अंगावर उडाले, यात ती जखमी झाली. आई आणि आजोबांच्या देखील अंगावर केमिकल उडाल्याने ते देखील किरकोळ जखमी झाले आहेत. शार्वी ची प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निकम यांनी दिली आहे. डॉक्टर, सेंटर च्या हलगर्जीपणा विरोधात शार्वी च्या आई वडिलांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पाच जनांनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.