पुणे : राज्यात संचारबंदी असतानाही मुंबईहून मुली आणत पुण्याजवळील कुडजे गावातील एका फार्महाऊसवर सुरू असलेल्या डान्स पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला होता. या पार्टीत सहभागी झालेल्या 9 जणांना पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये पुणे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याचा देखील समावेश होता. या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
पार्टीसाठी मुंबईहून आणल्या डान्सर तरूणी
या पार्टीसाठी मुंबईहून डान्सर तरुणींना घेऊन आलेल्या प्राजक्ता मुकुंद जाधव (वय 26) या तरुणीसह मंगेश राजेंद्र सहाने (वय 32), निखिल सुनिल पवार (वय 33), ध्वनित समीर राजपूत (वय 25), सुजित किरण अंबवले (वय 34), निलेश उत्तमराव बोर्धे (वय 29), आदित्य संजय मदने (वय 24), समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे (वय 39) आणि विवेकानंद विष्णू बडे (वय 42) यांना अटक करण्यात आली होती.
कनिष्ठ अभियंत्याला अटक
अटक करण्यात आलेल्यांमधील बहुतांश जण हे पुणे महापालिकेतील ठेकेदार आहेत. तर विवेकानंद बडे हे पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये कनिष्ठ अभियंता आहेत. त्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेले बडे आणि इतर ठेकेदार यांच्यात काही संबंध आहेत का? याची देखील चौकशी केली जाणार असल्याचे पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांनी सांगितले.
डान्स पार्टीवर पोलिसांची धाड
बुधवारी (26 एप्रिल) कुडजे गावातील लबडे फार्महाऊसवर पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर उत्तम नगर पोलिसांच्या एका पथकाने मंगळवारी मध्यरात्री या ठिकाणी छापा मारला. यावेळी त्यांना काही तरुणी डीजेच्या तालावर नाचत असताना दिसले. तर त्या ठिकाणी असणारे पुरुष मद्यप्राशन करताना आढळून आले. या फार्म हाऊसची झडती घेतली असता याठिकाणी बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसायही सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या ठिकाणाहून दारूच्या बाटल्या, डीजे सिस्टीम, रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले आहे.
आरोपींना पोलीस कोठडी
या फार्म हाऊसचे व्यवस्थापक समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे आणि विवेकानंद विष्णू बडे यांनी या पार्टीचे आयोजन केले होते. आरोपी प्राजक्ता मुकुंद जाधव ही डान्सर मुली घेऊन या ठिकाणी आली होती. या सर्वांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने तीन मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.