पुणे - भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घडलेल्या घटनेत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या गंभीर घटनेनंतर पुणे औंध जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्ष (SNCU) सुरक्षित असून अशा घटना घडणार नाहीत याची काळजी जिल्हा रुग्णालयाकडून घेतली जात आहे, अशी माहिती पुणे औंध जिल्हा रुग्णालय शल्य-चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी 'ईटीव्ही'शी बोलताना दिली आहे. तसेच आठवड्याला इलेक्ट्रिकची पाहणी केली जाते. दरम्यान, फायर ऑडिट करण्यात आले असून भंडाऱ्यातील गंभीर घटनेनंतर पुन्हा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयात काय उपाययोजना?
भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्टसर्किट होऊन मध्यरात्री आग लागली. यात, दहा नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सात बालकांना वाचवण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा रुग्णालयात असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षात काय उपाययोजना आहे, याची माहिती घेण्यात आली.
24 खाटांचा नवजात शिशु अतिदक्षता कक्ष
पुणे औंध जिल्हा रुग्णालयात 24 खाटांचा नवजात शिशु कक्ष असून तिथे नवजात बालकांवर उपचार करण्याची सुविधा या ठिकाणी आहे. अवघ्या महाराष्ट्रभरातून या जिल्ह्या रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात उपचार घेण्यासाठी नवजात बालक येतात. सध्या इथे आठ बालकांवर उपचार सुरू आहेत.
आपत्कालीन मार्ग
विशेष म्हणजे काही अघटित घडल्यास नवजात शिशु अतिदक्षता कक्षातून सुरक्षित बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन मार्ग असल्याचे निदर्शनास आले आहे. कक्षात दररोज वेळोवेळी स्वच्छता केली जाते. गेल्या महिन्यात 51 बालकांवर उपचार करण्यात आवे. कोरोनाकाळातदेखील हे नवजात शिशु अतिदक्षता कक्ष सुरू होते, अशी माहिती डॉ. सुचित्रा खेडकर आणि रुग्णालयाचे जमादार ज्ञानेश्वर पाटोळे यांनी दिली आहे.
सहाशे ग्रॅम वजनाच्या बालकांपासून केले जातात उपचार..!
कक्षात बालकांना ऑक्सिजन देण्याची सुविधा असून अवघ्या 600 ग्रॅम वजनाच्या नवजात बालकांपासून कक्षात उपचार केले जातात. त्यांचे प्राण वाचविण्यात येथील रुग्णालय प्रशासनाला वेळोवेळी यश आलेले आहे. रात्रपाळीला दोन नर्स आणि एक डॉक्टर स्वतः नवजात शिशु अतिदक्षता कक्षात उपस्थित असतात, असे डॉ. सुचित्रा खेडकर यांनी अधोरेखित केले आहे.
पुन्हा फायर ऑडिट करण्यासाठी पत्र?
यावेळी रुग्णालयाचे शल्यचिकित्सक म्हणाले, की 24 खाटांचे एक युनिट (SNCU) आहे, जिथे लहान बालकांवर उपचार केले जातात. त्याठिकाणी नियमित इलेक्ट्रिशियन पाहणी करतो. आठवड्याला इलेक्ट्रिकचे तांत्रिक कर्मचारी आणि रुग्णालय विजतंत्री पाहणी करतात. त्यामुळे तिथे व्यवस्थित काळजी घेतली जाते. कोणत्याही प्रकारची घटना घडेल, अशी या ठिकाणी परिस्थती नाही. भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आजच रुग्णालयाचे आणि SNCUचे इलेक्ट्रिक ऑडिट करण्याचे सूचित केले आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या अग्निशामक विभागाने फायर ऑडिट केले आहे. आता परत ऑडिट करण्याविषयी पत्र दिले आणि तसेच पी. डब्ल्यू. डी. विभागालापण फायर ऑडिटविषयी सूचना दिल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.