पुणे - शहर व जिल्ह्यात आजपासून मिनी लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा विळखा बसत चालला असताना हे लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शनिवारी पुणे शहरात आणि जिल्ह्यात एका दिवसात नवे रुग्ण सापडण्याचा उच्चांक गाठला गेला आहे.
पुणे शहरात 3 एप्रिलला दिवसभरात तब्बल नवीन 5 हजार 720 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 3, 293 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आज 44 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 9 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या 837 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज घडीला पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 39 हजार 518 इतकी आहे. आज 20 हजार 66 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.
हेही वाचा-उद्रेक.. राज्यात शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या ५० हजाराच्या उंबरठ्यावर, २७७ जणांचा मृत्यू
जिल्ह्यातही कोरोनाचा कहर-
पुणे जिल्ह्यातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात 10 हजार 827 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांची संख्या 17 हजार 160 आहे. तर 54 हजार 971 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
मिनी लॉकडाऊनमुळे नुकसान पण प्रशासनाला सहकार्य करणार
वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर लावण्यात आलेल्या मिनी लॉकडाऊनमुळे आमचे प्रचंड नुकसान होणार आहे. नुकसान जरी होत असेल तरी आम्ही प्रशासनाला सहकार्य करणार आहोत आणि प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीचा काटेकोरपणे पालन करणार असल्याची भूमिका महात्मा फुले मंडईतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा-पुण्यात आजपासून मिनी लॉकडाऊन; बाजारपेठेत गर्दी झाली कमी
मुंबईत आढळले आज 9,090 नवे रुग्ण
मुंबईत सलग दोन दिवस 8 हजाराच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. आज त्यात वाढ होऊन तब्बल 9,090 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद आज झाली आहे.
राज्यात आढळले 49 हजार 447 नवीन रुग्ण-
राज्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे. आज राज्यात तब्बल 49 हजार 447 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर 37 हजार 821 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 277 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.