पुणे - कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कोल्हापूरच्या ( Kolhapur By Election Result ) मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांचे नेतृत्व नाकारले आहे. स्वगृही भाजपला निवडून आणण्यात पाटील यांना अपयश आले आहे. आता त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँगेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी ( Congress Leader Mohan Joshi Criticized Chandrakant Patil ) यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला तर संन्यास घेऊन हिमालयात निघून जाईन, अशी गर्जना चंद्रकांत पाटील यांनी प्रचारात केली होती. कोल्हापूरकरांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून देऊन भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. आता चंद्रकांतदादा शब्द पाळा, राजकीय संन्यास घ्या, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.
'अनेक खटपटी करूनही पराभव' - कोल्हापूरमध्ये पराभव होईल, अशा भीतीने पाटील 2019 साली पुण्यात कोथरुड मतदारसंघात आले. त्यांची लादलेली उमेदवारी भाजपच्याच मतदारांना मान्य नव्हती. अनेक खटपटी लटपटी करूनही त्यांना निसटता विजय मिळाला होता. पदवीधर मतदारसंघही पाटील यांना राखता आला नाही आणि खुद्द त्यांच्या कोल्हापूरची जागाही गमवावी लागली आहे. या पोटनिवडणुकीतील प्रचारासाठी कोथरुड मतदारसंघ वाऱ्यावर सोडून पाटील कोल्हापूरात मुक्कामाला होते. एवढेच नाही तर, त्यांनी पुण्यातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांची फौज कोल्हापुरात नेली. प्रचाराचा धडाका उडवायचा प्रयत्न केला. कोल्हापुरातील मतदारांनी चंद्रकांत पाटील यांच्या कोणत्याच प्रयत्नांना दाद दिली नाही. उलट मतदारांनी त्यांनाच अस्मान दाखविले, अशी टीका देखील मोहन जोशी यांनी केली.