पुणे - राजकीय व्यासपीठावरील एका कार्यकर्त्याला त्याच्या पहिल्याच भाषणात रडू कोसळल्याचे पाहिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्याला धीर दिल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमात ही घटना घडली. यावेळी धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्याला पाठीवर थाप देत प्रोत्साहन दिले.
माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ हे धंनजय मुंडे यांच्या समोर पहिल्यांदाच भाषण करत होते. त्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द न फुटता हुंदके आले. भावनिक होऊन त्यांना अश्रू अनावर झाले. हे पाहून व्यासपीठावर बसलेल्या धनंजय मुंडेंनी त्यांच्या दिशेने पावले टाकत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच पाठीवर थाप देत भाषण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यानंतर हाच धागा पकडून धंनजय मुंडे यांनी आपल्या पहिल्याच भाषणाच्या आठवणीला उजाळा दिला.
मुंडे म्हणाले, माजी नगर सेवक शेखर ओव्हाळ यांचे भाषण ऐकून त्यांचे पाहिल्यांदाच भाषण होते यावर विश्वास बसणार नाही. त्यांचे भाषण ऐकून मला माझे सुरुवातीचे भाषण आठवले. 1995 ला मराठवाडा कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून सत्कार झाला होता. तेव्हा, माझे पहिले भाषण झाले. दहा मित्रांनी दहा भाषणे लिहून दिली ते वाचले. परंतु, जेव्हा व्यापीठावर गेलो, हातात माईक आला, तेव्हा दहाच्या दहाही भाषणे विसरून गेलो होतो आणि मनाचे बोललो. केवळ आठ मिनिटे बोललो पण पोटात आणि मनातून आलेले बोललो होतो. त्यावेळपासून लागलेली सवय ती 23 वर्षे झाली जात नाही, असेही मुंडे म्हणाले.