पुणे - पुण्यातील धायरी भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वात पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.
पुण्याच्या धायरी परिसरातील नागरिकांना मागील काही दिवसांपासून पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. याचे कारण पाणीपुरवठा करणारी महापालिकेची अपुरी यंत्रणा. तर दुसरे कारण म्हणजे पाणीचोरांविरोधात महापालिकेने पाऊले उचलताच पाणीपुरवठादारांची आडमुठी भूमिका. त्यामुळे धायरीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टँकर चालकांकडे पाण्याची मागणी करूनही पाणी पुरविले जात नाही. त्यामुळे या भागातील १०० हून अधिक सोसायट्यातील नागरिकांना पाणी मिळत नाही. तर दुसरीकडे टँकरच्या संख्या मर्यादित असल्यामुळे महापालिकाही त्यांना पाणी पुरवू शकत नाही.
स्थानिक प्रतिनिधी लक्ष देत नाही, आमदार दखल घेत नाही म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धायरीतील भैरोबा मंदिर ते वडगाव बुद्रुक या मार्गावर 'हंडामोर्चा' काढण्यात आला होता. यावेळी नागरिकांच्या वतीने पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.