पुणे - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यातून गैरसमज होतोय, हे खर आहे. परंतु, सर्वांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तसेच, लोकांमध्ये जाऊन आपल्या पक्षाचे संघटन मजबूत करण्याबद्दलही दुमत नाही. मात्र, प्रतिक्रिया देताना, किंवा भूमिका मांडताना ती विचारपुर्वक मांडायला हवी, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
'घटना दुरुस्ती झाली तर प्रश्न सुटेल'
मराठा आरक्षणाबाबत दोन अडचणी आहेत. त्यामध्ये मधल्या काळात सुप्रीम कोर्टाच्या (102)व्या घटना दुरुस्तीच्या निर्णयामुळे आरक्षण देण्याचे राज्याचे अधिकार केंद्राकडे गेले. त्यात जर केंद्र सरकार काही घटना दुरुस्ती करत असेल, तर प्रश्न सुटेल. परंतु, 50 टक्क्यांच्या वर आरक्षण जाता कामा नये, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, तो तसाच राहतो. त्याच्यात केंद्र सरकार कशी दुरुस्ती करते हे महत्त्वाचे आहे. 'ईडबल्यूएस'बाबत केंद्राने जसे 50 टक्क्यांच्या वर जाऊन 10 टक्के आरक्षण दिले. तसा, विचार मराठा समाजाबद्दल झाला, तर हा प्रश्न सुटण्यास मदत हाऊ शकेल, असेही वळसे पाटील म्हणाले आहेत.
'संजय राठोड यांना क्लीन चीट नाही'
संजय राठोड यांना क्लीन चीट नाही. त्याबाबतचा तपास सुरू आहे. दरम्यान, संजय राठोड प्रकरणी पुणे पोलिसांनी कोणाला माहिती दिली याची मला माहिती नाही. पुणे पोलीस याचा तपास करत आहेत. त्याबाबतचा अहवाल आणखी आलेला नाही. त्यामुळे क्लीन चीट देण्याचा संबंधच नाही. अहवाल आल्यानंतर त्यावर भाष्य करता येईल, असे स्पष्टीकरण वळसे पाटील यांनी दिले आहे.