पुणे - पुण्यात रखवलदाराचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. दिलीप उर्फ रवींद्र रावण तावरे (वय ४७) असे खून झालेल्या रखवालदाराचे नाव आहे. पुण्याच्या कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीमध्ये अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यात दिलीप रखवालदार होते. या प्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपचारांपूर्वीच झाला मृत्यू-
याबाबत पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तावरे, त्यांची आई, दोन मुले अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यात राहायला आहेत. तावरे मद्यपी असल्याने त्यांच्या पत्नीने वादातून सोडून दिले होते. तावरेचा भाऊ डहाणूकर कॉलनीतील एका इमारतीत रखवालदार आहे. तावरे अर्धवट झालेल्या बंगल्यात रखवालदार म्हणून काम करत होता. शुक्रवारी (२५ डिसेंबर) तो बंगल्याच्या आवारात बेशुद्धवस्थेत पडल्याचे त्याच्या मुलाने पाहिले. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले असता उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याचे तसेच मारहाण झाल्याचे निष्पन्न-
त्यानंतर या घटनेची माहिती अलंकार पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठवला होता. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याचे तसेच मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती अलंकार पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन जगदाळे यांनी दिली. तावरेच्या खुनामागचे कारण समजू शकले नाही. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करत आहेत.
हेही वाचा- सीबीआयने सुशांतसिंह प्रकरणाचा खुलासा करावा - गृहमंत्री