पुणे - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर भाषण केले होते. मशिदी बाहेरील भोंगे काढले नाहीतर दुप्पट आवाजाने मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवा, असे राज ठाकरे म्हणाले होते. यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका जवळ येतात तसे अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात. एखादे गिरगीट जसे रंग बदलतात तसे माणसेही रंग बदलत आहेत, अशी टीका नितीन राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे. पुण्यात पर्यायी इंधन क्षेत्रातील उद्योजक व गुंतवणूकदारांची परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
जातीयवाद करायची गरज नाही - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानावर माझा विश्वास आहे. भारत देश हा विविध जाती, भाषांनी नटलेला देश आहे. हा देश एकसंघ ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. कुठल्याही समाजाबद्दल बोलणे चुकीचे आहे. जातीयवाद करायची गरज नाही, असेदेखील नितीन राऊत म्हणाले.
कमी खर्चात चार्जिंग स्टेशन उभारण्याचा विचार - पुण्यामधील पर्यायी इंथान परिषद उमेदीचा उपक्रम आहे. आम्ही हायड्रोजनवर काम करत आहोत. या क्षेत्रात महाराष्ट्र उतरणार आहे. सर्व कंपन्यांबरोबर आम्ही चार्जिंग स्टेशनवर चर्चा करत आहोत. ८५ पैसे दुचाकी आणि १ रुपयात चार चाकी इलेक्ट्रिकवर धावू शकते. त्यामुळे कमी खर्चात चार्जिंग स्टेशन उभारण्याचा विचार आहे, असे देखील नितीन राऊत म्हणाले.