मुंबई - शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा ( Koregaon Bhima ) येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला ( Historic Vijaystamb ) दरवर्षी 1 जानेवारीला शौर्य दिनाच्या ( Shourya Din ) निमित्ताने राज्यभरातील लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करणे त्याचबरोबर विविध सुविधा निर्माण करून या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे ( Department of Social Justice ) घेण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Minister Dhananjay Munde ) यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे केली. विजयस्तंभ व परिसराचा प्रेरणास्थळ म्हणून विकास व सुशोभीकरण करण्याचा बृहत आराखडा तयार करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल दोन महिन्यांच्या आत प्राप्त होईल, असेही मुंडे म्हणाले.
सर्वंकष आराखडा -
शौर्य दिनाचा अभिवादन कार्यक्रम 1 जानेवारी 2022 पासून दरवर्षी आयोजित करणे तसेच विजयस्तंभ आणि परिसरात मूलभूत सोयी-सुविधा निर्माण करून सुशोभीकरण व अन्य सर्वंकष विकास करण्यात यावा. तसेच येथील सर्व अल्प व दीर्घकालीन उपक्रमांचे आयोजन करणे, ही संपूर्ण जबाबदारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे घेण्याबाबत 14 डिसेंबर 2021 रोजी यासंबंधित सर्वांची बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.
उच्चस्तरीय समिती नेमली -
परिसराचा विकास करण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांना निर्देशित करून आवश्यक असलेला निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2022 रोजी शौर्य दिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये जिल्हाधिकारी पुणे ( Collector Pune ) हे अध्यक्ष असतील. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, बार्टीचे महासंचालक, हवेलीचे प्रांत अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता (विद्युत), लोणीकंद ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे सदस्य म्हणून नेमण्यात आले असून समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त हे सदस्य सचिव असतील. 1 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमास लागणारा निधी तातडीची बाब म्हणून जिल्हाधिकारी पुणे यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश बार्टीचे महासंचालक यांना दिले आहेत, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी आपल्या निवेदनात सभागृहात सादर केली आहे.