पुणे - राज्यातील आणि शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा (Maharashtra School Reopen) १ डिसेंबर म्हणजेच उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेने शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती पुण्याचे महापौर मुरलधीधर मोहोळ यांनी दिली.
महापौर आणि आयुक्तांच्या बैठकीनंतर निर्णय -
पुणे शहर परिसरातील शाळा सुरू करण्याबाबत आज पुण्याचे महापौर आणि महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता पुढील तीन दिवस शहरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
पालक संघटना, शिक्षणसंस्था सोबत याबाबत चर्चा करणार -
याबाबत महापौर म्हणाले, राज्य सरकारने पहिली ते चौथी शाळा उद्यापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तरीदेखील या निर्णयाबाबत पालक संघटना, शिक्षण संस्थांसोबत याबाबत चर्चा करणार आहोत,असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले होते.
ओमिक्रॉन पार्श्वभूमीवर महापालिकेचा सावध पवित्रा -
ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे. पुण्यातील शाळांनी पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण केलीय. तर, दुसरीकडे शाळा सुरू करावी अशी पालकांची भूमिका आहे. त्यामुळे शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.