पुणे - आपल्या देशात आपण अनेक कला जोपासताना पाहतो. भारतीय सांस्कृतीत कलेला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यात चित्रकला, हस्तकला, वारली पेंटिंग, स्केच, अशा विविध कला जोपासलेल्या आपण पाहतो. मात्र, गेल्या 58 वर्षांपासून पुण्यातील डेक्कन परिसरात असलेल्या फुटपाथवर चांभाराचे काम करणारे काशिनाथ चव्हाण हे पेनने चित्र काढण्याची कला जोपासत ( Kashinath Chavan Painter From Pune ) आहे. इतकेच नाही तर त्याच्या या कलेची जर्मनमधील मोठ्या व्यक्तीने दखल घेतली ( Kashinath Chavan Was Noticed By Germany )आहे. तसेच, जर्मन भाषेतील पुस्तकात वेगवेगळ्या कला जोपासणाऱ्या व्यक्तींमध्ये काशिनाथ चव्हाण यांच्याविषयी लेखही लिहला आहे.
मूळचे जुन्नर तालुक्यातील माणिकडोह या गावचे असणारे काशिनाथ चव्हाण हे गेल्या 58 वर्षांपासून पुण्यात राहतात. त्यांचा मूळ व्यवसाय चप्पल शिवण्याचा. चप्पल शिवण्याच्या कामासोबतच त्यांना पेनाने चित्र काढण्याचा छंद देखील लागला. पुण्यातल्या डेक्कन परिसरात गेल्या 58 वर्षांपासून ते चप्पल शिवून देण्याची कामे करतात. आणि मोकळ्या वेळेत पेनाने चित्र न बघता काढतात. त्यांनी ही कला स्वतः शिकली आहे. आतापर्यंत चव्हाण यांनी साईबाबा, स्वामी समर्थ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच थोर महापुरुषांची अनेक चित्रे पेनने काढली आहे.
त्या चित्रांचा झाला आर्थिक फायदा - चव्हाण यांनी 15 वर्षांपूर्वी जर्मन लेखक जोयना क्रिस्टोस हे पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. तेव्हा डेक्कन परिसरात एका बुटाच्या शोरूममध्ये बूट घेण्यासाठी आल्यानंतर त्यांची नजर चव्हाण यांनी काढलेल्या पेनाच्या पेंटिंगवर गेली. त्यांनी लगेच ती पेंटिंग चव्हाण यांच्याकडून 2 हजार रुपयांत घेतली. अन् त्यानंतर जोयना क्रिस्टोस यांनी त्यांच्या पुस्तकात 'जगभरातील कला क्रूर' काशिनाथ चव्हाण यांच्या चित्रांचा उल्लेख केला आहे.
आजही चव्हाण जोपासत आहे कला - काशिनाथ चव्हाण यांचे वय 77 वर्ष आहे. त्यांना या चित्रांचा आर्थिक फायदा झाल्याचे चव्हाण सांगतात. जोयना क्रिस्टोस यांनी जवळपास 70 हजारापर्यंत रक्कम चव्हाणांना दिली आहे. साधा चप्पल शिवणारा चांभार, अशी आगळीवेगळी कला जोपासतो आहे. आजही ते चित्र काढायला लागले की, नागरिकांची आजूबाजूला मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळते.