पुणे - खुनाच्या दोन गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कुख्यात गुंड गजा उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याची सोमवारी तळोजा तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटका होताच त्याच्या चाहत्यांनी पुणे-मुंबई महामार्गावरूनच जंगी मिरवणूक काढत त्याचे स्वागत केले. गजानन मारणे आणि त्याच्या टोळीतील यांची अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणातून न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
गजानन मारणे कारागृहातून बाहेर पडताच त्याच्या चाहत्यांनी महाराष्ट्राचा किंग असे स्टेटस टाकत पुणे-मुंबई महामार्गावरून त्याची मिरवणूक काढली. मुंबईहून पुण्यात येताना मोठ्या गाड्यांचा ताफा त्याच्या दिमतीला होता. गजानन मारणे याची मुक्तता झाल्याने त्याच्या कार्यकर्त्यांनी तळोजा तुरुंगाबाहेर गाड्यांचा ताफा आणला होता. यावेळी तुरुंगाबाहेर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यावेळी डीजेही लावण्यात आला होता. त्यानंतर पुण्यापर्यंतही जंगी मिरवणूक काढल्याची माहिती मिळाली. या प्रकारामुळे शहरात प्रचंड खळबळ माजली होती.
तुरुंगाबाहेर पडताच गुन्हा दाखल...
तुरुंगाबाहेर आल्यानंतर मारणेवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात गुन्हा दाखल झाला आहे. मारणे हा त्याच्या साथीदारासह पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावरून पुण्याच्या दिशेने येत होते. तेव्हा, त्यांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा ओरडा करत दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक धायगुडे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेप्रकरणी भा.द.वि कलम १४३, २८३, १८८, इतर कलमासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची डोकेदुखी वाढणार?
काही वर्षांपूर्वी पुण्यात घायवळ आणि मारणे या दोन टोळ्यांची दहशत होती. गुंडांच्या या टोळीने एकमेकांच्या टोळीवर जीवघेणे हल्ले केले होते. या टोळीची वाढती दहशत पाहून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत कारागृहात डांबले होते. परंतु आता पुन्हा या दोन्ही डोळ्यातील बहुतांश सदस्य आणि त्याचे प्रमुख तुरुंगाबाहेर आले आहेत. त्यातच गजानन मारणेचे चाहत्यांनी ज्या प्रकारे स्वागत केले, ते पाहून पोलिसांसमोरची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट होते.
हेही वाचा - भारतासाठी दोन टी-२० सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूची निवृत्ती