पुणे - राज्यात उष्णतेचा पारा अधिकच वाढताना दिसत आहे. मागील काही दिवस तापमानाचा पारा खाली घसरला होता खरा, मात्र आता पुन्हा तापमानात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यातच आता आणखी काही दिवस उष्णता अशीच राहून राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. पण, या वाढत्या उष्णतेपेक्षा महाराष्ट्राला जास्त चिंता सतावते ती पाण्याची. उन्हाळाही येणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील ( Pune dam water level ) धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे? याबाबत 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने जाणून घेतले.
पुणे शहर आणि पाण्याचा प्रश्न : पुणे शहराचा विचार केला असता सध्या पुणे शहर हे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यातच पुणे महानगर पालिकेत नुकतीच जोडली गेलेली गावे, त्यामुळे पुणे शहर महानगरपालिका ही भौगोलिकदृष्ट्या देशातील सगळ्यात मोठी महानगरपालिका झाली आहे. आणि त्यासोबतच शहरीकरण आणि नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पाण्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे.
गेली अनेक वर्षे पुण्याच्या पाण्यावरून राजकारण ही तापताना दिसत आहे. मार्च महिन्यातच पुणे शहरातल्या अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. शहरालगत असलेल्या चार धरणांमधून पिण्याच्या पाण्याची गरज भासते. हेच पाणी नागरिकांसाठी आणि औद्योगिकरणासाठीसुद्धा सोडले जाते. कशी आहे पुण्याच्या धरणांची सद्यास्थिती? पुण्याच्या धरणांमध्ये सध्या किती पाणीसाठा आहेय़ तो पुणेकरांना किती दिवस पुरेल? हा एक मोठा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. पुणे शहराभोवती असणाऱ्या धरणांची साठवण क्षमता, धरणांमधील पाण्याचा सद्याचा साठा, ते पाणी किती दिवस पुरेल, याच्या आकडेवारीसह आम्ही सत्यता मांडण्याचा प्रयत्न या रिपोर्टमधून केला.
पुण्याला पाणीपुरवठा करणारे मुख्य चार धरण आहेत
- खडकवासला
- पानशेत
- वरसगाव
- टेमघर
या चार धरणांमधून पुण्याला मिळत इतकं पाणी : यातील सगळ्यात मोठे धरण म्हणजे वरसगावमधून सगळ्यात जास्त पाणी पुण्याला मिळते. वरसगाव धरणातून पुण्याला जवळपास 12 टीएमसी पाणी मिळते. पानशेतमधून 11 टीएमसी, टेमघर धरणातून 4, तर खडकवासला धरणातून जवळपास 1.97 टीएमसी पाणी हे पुणे शहराला मिळते.
सध्या 14.64 टीएमसी पाणीसाठा शिल्लक : आता सध्या पुणे शहराला पाणी पुरवणारे या 4 धरणामध्ये एकूण 14.64 टीएमसी पाणी शिल्लक आहे. म्हणजेच हे चारही धरणे 50.22 टक्के इतके भरलेले आहेत. मागच्या वर्षी याच महिन्याचा विचार केला तर, या चार धरणांमध्ये 16.38 टीएमसी इतके पाणी होते आणि त्यावेळी 56.18 टक्के इतके हे धरण भरलेले होते.
4 धरणांत 28 टीएमसी इतका असतो पाणीसाठा : पुणे शहराचा विचार करता शहरातल्या नागरिकांसाठी आणि कंपन्यांसाठी देखील याच चार धरणांचा पाणीसाठा वापरला जातो. या चार धरणांत मिळून 28 टीएमसी इतका पाणीसाठा असतो आणि पुणे शहराला वर्षाला जवळपास 18 टीएमसी पाणी द्यावे लागते. नियमानुसार पाहल्यास पुण्याला केवळ 11 टीएमसी पाणीसाठा द्यायला हवा. पुणे शहराचे वाढते स्वरूप लक्षात घेता वरील जादा 7 टीएमसी पाणी पुण्याला सोडले जाते.
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुणे शहराला प्रत्येक महिन्याला दीड टीएमसी इतके पाणी लागते. त्यानुसार पुणे शहर महानगरपालिका पाणीपट्टीच्या स्वरुपात एका धरणाला जवळपास 70 कोटी रुपये देखील देते. त्यातच शहराची पाण्याची गरज लक्षात घेता पुणे शहरासाठी दहा टक्के पाणी साठा हा राखीव ठेवणे बंधनकारक आहे, तो जुलै महिन्यापर्यंत ठेवला जातो. म्हणजेच जर जून आणि जुलैमध्ये पाऊस व्यवस्थित नाही झाला, तर या राखीव पाणीसाठ्याचा उपयोग करता येईल. त्याचबरोबर या चारही धरणांतून वर्षाला जवळपास 8 ते 13 टीएमसी पाणी हे कॅनलला सोडावे लागते, जे पुढे पुणे जिल्ह्यातील इंदापूर पर्यंत जाते. असे जवळपास तीन ते चार रोटेशनमधून कॅनलला पाणी जाते. एका रोटेशनला जवळपास 7 टीएमसी इतके पाणी हे कॅनलला सोडावे लागते. आणि उन्हाळ्यात असे तीन ते चार रोटेशन होतात.
सध्या चारही धरणांमध्ये एकूण 14.64 टीएमसी पाणी शिल्लक आहे. या धरणांमध्ये 28 टीएमसी पाणीसाठा असतो. गेल्यावर्षीप्रमाणे या वर्षीही पाणीसाठा 50 टक्केच असल्याने पुणे शहराला इतका पाणीसाठा पुरेसे ठरणार का? हे आता पाहावे लागणार आहे.
हेही वाचा - म्हाडा परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा तपास करून गुन्हा दाखल करावा, एमपीएससी समन्वय समितीची मागणी