पुणे - राष्ट्रीय प्रशिक्षक ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे (Grandmaster Abhijit Kunte) यांची राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीने ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारासाठी (Dhyanchand Jeevan Gaurav Award) शिफारस केल्यानंतर काल त्यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्यांची निवड झाल्याने पुणेकरांसह महाराष्ट्राची देखील मान उंचावली गेली आहे. अभिजित कुंटे ग्रँड मास्टर किताब मिळवणारे पहिले पुणेकर आणि दुसरे महाराष्ट्र बुद्धिबळ पटू आहे. ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद याने ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या सोबत बातचीत केली आहे.
भारताला टॉप 1 करायचं आहे -
काल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खूप आनंद झाला आहे. याआधी प्रशिक्षक म्हणून निवड झाल्यानंतर जबाबदारीही वाढली होती आणि त्याच पद्धतीने ऑलम्पिक तसेच वर्ल्डकपमध्ये कामगिरी देखील करण्यात आलेली होती. येणाऱ्या काळात बुद्धिबळात भारताला टॉप वन करण्याचं स्वप्न आहे, असे यावेळी अभिजित कुंटे म्हणाले. त्याच पद्धतीने ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे एकाचवेळी अनेक लोक बुद्धिबळ खेळू शकतात. बुद्धिबळाच्या स्पर्धा मोठ्या होतात. पण आज एक तास, अर्धा तास, 10 मिनिटं अश्या घरबसल्या स्पर्धा होत आहे आणि याच ऑनलाईन स्पर्धांमुळे बुद्धिबळाबाबत मुलांमध्ये आवड देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असे देखील यावेळी कुंटे म्हणाले.
राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव -
ग्रँड मास्टर अभिजीत कुंटे यांची याआधी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या निवड समितीचे अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षक पदी निवड देखील झाली होती. हे किताब मिळवणारे ते पुण्यातून पहिले आणि महाराष्ट्रातील दुसरे बुद्धिबळपटू होते. बुद्धिबळपटू मृणालिनी कुंटे यांच्या या भावाला त्यांच्या बहिणीमुळे बुद्धिबळाची गोडी लागली. मोहन फडके यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे धडे गिरवून अवघ्या अकराव्या वर्षीच त्यांनी बारा वर्षाखालील मुलांच्या गटातील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. त्यानंतर विविध वयोगटातील सात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद आशियाई कॉमनवेल्थ आणि जागतिक स्पर्धेमध्ये अनेक पदके देखील त्यांनी मिळवली आहेत. मानाचा शिवछत्रपती पुरस्कारासह विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहेत. आता त्यांना जीवनगौरव पुरस्काराने येणाऱ्या 13 तारखेला राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.