पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारीदेखील ४ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील तीन रुग्ण एकाच परिसरातील आहेत. या रुग्णांच्या वाढीसह पिंपरी चिंचवड शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८९वर पोहचली आहे. आत्तापर्यंत २८ जणांना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तर एकूण चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणू थैमान घालत असून त्यांची संख्या दररोज वाढत आहे. आज ४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह अहवाल आला. या रुग्णांना उपचारासाठी महानगर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, विशेष म्हणजे हे ४ ही रुग्ण ३० वयाच्या आतील आहेत. यात एका २५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर इतर २६, २७, २८ अशा वयाचे आहेत. हे तिघे रुपीनगर परिसरातील असून महिला मोशी परिसरातील असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, दुसरीकडे उपचार घेऊन कोरोनामुक्त होणाऱ्या व्यक्तींची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. शहरातील आत्तापर्यंत एकूण २८ जण ठणठणीत बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.