पुणे - भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई व कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन यांच्यासह एका महिलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औंध परिसरात एका व्यक्तीला जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून हर्षवर्धन जाधव व त्यांची मैत्रीण इषा झा यांच्या विरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाम्पत्याचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे.
मोटारीचा दरवाजा उघडताना दुचाकीस्वार दाम्पत्य खाली पडले. त्यामुळे त्यांनी जाब विचारल्याचा राग आल्यामुळे दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी संभाजीनगर जिल्हयातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या सोबत असणाऱ्या मैत्रिणीविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षवर्धन रायभान जाधव (वय ४३, रा. बालेवाडी ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची मैत्रिण इषा बालाकांत झा (वय ३७, रा. वाकड) यांच्याविरूध्द चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय चड्डा (वय ५५)आणि ममता चड्डा (वय ४८, दोघेही रा. बापोडी) अशी जखमी झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.
ह्रदय शस्त्रक्रिया झाल्याचे सांगूनही जाधव यांनी केली वृद्धास बेदम मारहाण -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय आणि त्यांच्या पत्नी ममता सोमवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून औंध येथून संघवी नगरकडे जात होते. त्यावेळी हर्षवर्धन यांनी त्यांच्या मोटारीचा दरवाजा अचानकपणे उघडला. त्यामुळे चड्डा दाम्पत्य खाली पडले. याचा त्यांनी हर्षवर्धन जाधव यांना जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे हर्षवर्धन यांच्यासह त्यांची मैत्रिण इषा झा यांनी चड्डा दाम्पत्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. अजय चड्डा यांच्या हदयाचे ऑपरेशन झालेले असतानाही दोघांनी त्यांच्या छातीमध्ये आणि पोटामध्ये लाथा मारल्या. त्याशिवाय ममता यांनाही मारहाण केली. त्यांनी चड्डा दाम्पत्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने लाथा मारून जखमी केले. याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे.