पुणे - दोन वर्षांच्या कालावधीनंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत माऊली माऊलीच्या जयघोषात पुण्यनगरीत आगमन झाले आहे. यावेळी लाखो वारकरी पालख्यांसह पुण्यात दाखल झाले आहेत. ( Dnyneshwar Maharaj Mauli Palkhi arrival In Pune )
पुणे भक्तिमय - खांद्यावर भगवी पताका. गळ्यात तुळशीमाळ. टाळ-मृदुंगाचा नाद आणि विठू नामाचा गजर अशा भक्तिरसात न्हाऊन निघालेली 'इंद्रायणी' पुण्यनगरीत विसावली. पुण्यात सकाळपासूनच वारकरी दाखल होण्यास सुरुवात झाले होते. लाखो वैष्णवांच्या मेळाव्यात पालखी आषाढी वारीकडे निघाली आहे. पुण्यात सकाळपासूनच भक्तिमय वातावरण झाले होते. आता प्रत्येक मंदिरात पालखीच्या निमित्ताने आकर्षक सजावटही करण्यात आली आहे.
भाविकांमध्ये उत्साही वातावरण - आज आणि उद्या पुण्यात मुक्काम केल्यानंतर पालख्या पुढच्या प्रवासाला जातील. कोरोना महामारीतील दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर यंदा पालखी सोहळ्याला शासनाने परवानगी दिल्याने पुणेकरांसह महाराष्ट्रातील भाविकांमध्ये उत्साही वातावरण आहे.
पालखी दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी - नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात विसाव्यासाठी संत तुकाराम महाराजांची पालखी जाणार आहे. आता ही पालखी गुरुवारी पूर्ण दिवस पालखी पुण्यात मुक्कामी असेल. त्यानिमित्ताने दर्शनासाठी पुणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरणही दिसून येत आहे. दोन वर्षांनंतर पालखी सोहळा प्रत्यक्षात मार्गावरून येत असल्याने पालखीचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली होती.
हेही वाचा - CM Thackeray Video : कोरोना, हिंदूत्व, राजीनामा, चर्चा आणि आवाहन; पाहा, मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण व्हिडिओ